औरंगाबाद : मागील पावसाळ्यात मराठवाड्यात सर्वत्र जोरदार पाऊस बरसला होता. आता पाऊस पुरे, अशी म्हणण्याची वेळ लोकांवर आली होती. परिणामी, भूजल पातळीत वाढ झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक भूजल वाढल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
प्रादेशिक उपसंचालक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाने मागील जानेवारी महिन्यात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत ७६ तालुक्यातील ८७५ विहिरीतील पाणी पातळी तपासली. हा अहवाल समोर आला आहे. मराठवाड्यात मागील ५ वर्षांतील जानेवारी महिन्यातील भूजल पातळी ७.८९ मीटर असते. या जानेवारीत ६.६५ मीटर भूजल पातळी राहिली, म्हणजे १.०५ मीटरने भूजल पातळी मराठवाड्यात वाढली. यातही औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे २.०३ मीटर भूजल पातळी वाढली, तर सर्वात कमी भूजल पातळी लातूर जिल्ह्यात -०.४३ एवढी वाढली आहे. जालना जिल्ह्यात १.९१ मीटर, परभणी १ मीटर, हिंगोली ०.३९ मीटर, नांदेड १.६३ मीटर, उस्मानाबाद १.१९ मीटर तर बीड जिल्ह्यात ०.६६ मीटरने भूजलपातळी वाढली. परभणी, गंगाखेड, किनवट व चाकूर या तालुक्यात अन्य तालुक्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याची नोंद आहे.
कृषी विद्यापीठने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मराठवाड्यात १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान साधारणपणे ७२२.५ मिमी पाऊस पडतो. मात्र, मागील वर्षी सरासरीपेक्षा १६.९ टक्के अधिक पाऊस झाला. भूजलपातळी वाढली, तरी पाण्याचा अतिवापर टाळावा, पाणी जपून वापरावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
चौकट
सध्या तरी नाही पाणीटंचाई
मराठवाड्यात जानेवारी महिन्यात कुठेच १ मीटरपेक्षा खाली भूजल पातळी गेली नाही. यामुळे सध्या तरी पाणीटंचाईसारखी परिस्थिती नसल्याचे भूजल पातळीच्या सर्वेक्षणातून दिसून येते. मात्र, यापुढे पाण्याचा किती उपसा होतो, यावरून मार्च महिन्यात किती भूजल पातळी खाली गेली. याचा सर्वेक्षण केल्यावर उन्हाळ्यात मेपर्यंत काय परिस्थिती राहील, हे कळले.
डॉ.एम.डी. देशमुख
उपसंचालिका, प्रादेशिक उपसंचालक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा.