औरंगाबाद : औरंगाबाद शहराला सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. तब्बल ताशी ५६ किलोमीटर वेगाने वारे वाहिले. या वाऱ्यामुळे भिंत पडून एक महिला ठार झाली. तर दुसऱ्या एका घटनेत भिंत कोसळून आलमगीर कॉलनीतील अबुबकर शकील मोहंमदी (३) या बालकाचा मृत्यू झाला. अनेक भागात घरांचे पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या, तर विविध भागांत शेकडो झाडे उन्मळून पडली.
वाऱ्याच्या वेगामुळे ठिकठिकाणी झाडे मुळापासून उन्मळून पडली. एन-६ परिसरातील एका घरावर झाड पडल्याची घटना घडली. यावेळी झाड पडल्याने दुचाकीचेही नुकसान झाले. चेतक घोडा चौक परिसरात झाडाची फांदी पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. वादळी वाऱ्यानंतर पावसाला सुरुवात झाली मात्र, कुठे पावसाचा जोर कमी होता, तर कुठे अधिक. अवघ्या काही मिनिटांत पावसाचा जोर कमी झाला. सिडको, हडको भागात काही ठिकाणी गारा पडल्या. चिकलठाणा वेधशाळेत अवघ्या ०.२ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. तर ५६ कि.मी. प्रतितास इतका वाऱ्याचा वेग होता. ग्र्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस कॉलनी आणि परिसरातील सुमारे शंभर झाडे सोमवारी सायंकाळी वादळी पावसात जमीनदोस्त झाली.
वाळूज महानगराला झोडपलेवादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने सायंकाळी अर्ध्या वाळूज महानगराला चांगलेच झोडपले. सुमारे पाऊणतास झालेल्या पावसामुळे कामगार व व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
खामखेड्यात वीज पडून महिला ठारऔरंगाबाद तालुक्यातील खामखेडा येथील शेतात वीज पडून गंगूबाई चतुर भगुरे (६५, रा. फुलंब्री) ही महिला ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजता घडली. या घटनेत रेणुका ज्ञानेश्वर बंगारे (२४, रा. खामखेडा, ता.औरंगाबाद)ही महिला जखमी झाली असून, घटनेची फुलंब्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. फुलंब्री येथील गंगाबाई या आपल्या मुलीला भेटण्यासाठी तीन दिवसांपूर्वी खामखेडा येथे आल्या होत्या. सोमवारी खामखेडा शिवारातील गट क्रमांक १२३ मध्ये वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला. याचवेळी महिला आडोशाला जात असताना वीज पडून गंगूबाई आणि रेणुका ज्ञानेश्वर बंगारे या गंभीर जखमी झाल्या.नातेवाईकांनी त्यांना तात्काळ फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, गंगुबार्इंना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर रेणुका बंगारे यांना गंभीर इजा झाली असून, त्यांना उपचारासाठी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल केले आहे.या घटनेची फुलंब्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.