औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारे ट्रू जेट कंपनीचे हैदराबाद-औरंगाबाद- हैदराबाद विमान अचानक रद्द होण्याचा प्रकार सुरूच आहे. ऐन उड्डाणाच्या एक दिवस आधी माहिती देऊन गुरुवारी (दि. १) हे विमान रद्द करण्यात आले. शिवाय २, ३ आणि ५ आॅगस्ट रोजीही हे विमान रद्द करण्यात आले आहे.
नव्या विमानसेवेत वाढ होण्याची प्रतीक्षा केली जात असताना विमान अचानक रद्द होण्याच्या प्रकारांना प्रवाशांना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या काही महिन्यांत ट्रू जेटच्या प्रवाशांना या प्रकाराला सामोरे जावे लागले. गुरुवारीदेखील हाच प्रकार झाला. हैदराबादहून जवळपास ४५ प्रवासी औरंगाबादला येणार होते आणि जवळपास ४३ प्रवासी हैदराबादला जाणार होते; परंतु प्रवासाच्या एक दिवसाआधीच बुधवारी प्रवाशांना विमान रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. हैदराबादला जाणे गरजेचे असलेल्या अनेक प्रवाशांना पर्यायी वाहतूक व्यवस्था करून प्रवास करावा लागला, तर अनेकांनी पुढील दिवसांत प्रवासाचे नियोजन करण्यावर भर दिला. त्याबरोबरच आणखी सलग दोन दिवस म्हणजे २ आणि ३ आॅगस्ट आणि त्यानंतर ५ आॅगस्ट रोजी हे विमान रद्द राहणार आहे. ४ आॅगस्ट रोजी विमानाचे उड्डाण होईल, असे ट्रू जेट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
यापूर्वीही झाले विमान रद्दयापूर्वी ऐन उड्डाणाच्या चार तास आधी २२ जून रोजीदेखील ट्रू जेट कंपनीचे विमान रद्द झाले होते. त्याशिवाय ३० एप्रिल आणि त्यानंतर १७ जुलै रोजीही हे विमान रद्द झाले होते.
पुन्हा ऑपरेशनल कारणऑपरेशनल कारणामुळे विमानाचे उड्डाण रद्द झाले. यासंदर्भात प्रवाशांना बुधवारीच माहिती देण्यात आली होती, असे ट्रू जेट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अचानक विमान रद्द होत असल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रत्येक वेळी त्यासाठी आॅपरेशनल कारण कंपनीकडून सांगितले जात आहे. मात्र, विमान रद्द होण्याच्या प्रकाराविषयी प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.