औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या ट्रू जेट कंपनीच्या औरंगाबाद-हैदराबाद विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना रविवारी (दि. ११) घडली. विमान दुरुस्त होऊन हैदराबादकडे रवाना होईल, या अपेक्षेने दुपारी ४ वाजता आलेल्या ६० प्रवाशांना रात्री १० वाजेपर्यंत ताटकळत ठेवण्यात आले. परंतु अखेर विमान उड्डाण घेऊ शकणार नसल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. या प्रकाराविषयी संताप व्यक्त करीत प्रवासीविमानतळाबाहेर पडले.
औरंगाबादहून हैदराबादला जाण्यासाठी प्रवासी विमानतळार दाखल झाले होते. ६.३० वाजता विमानाचे उड्डाण होणार असल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली होती. त्यामुळे अनेक प्रवासी दुपारी ४ वाजेपासून विमानतळावर दाखल झाले होते. हैदराबाद- औरंगाबाद विमान विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर हे विमान परतीच्या प्रवासासाठी सज्ज होत होते. त्याच वेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची कल्पना वैमानिकाला आली. वैमानिक आणि ट्रू जेट कंपनीच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी विमानाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू असताना सर्व प्रवासी विमानतळावर बसून होते. प्रारंभी विमानास नेमक्या कोणत्या कारणांनी उशीर होत आहे, याविषयी प्रवाशांना काहीही कल्पना देण्यात आली नाही. त्यानंतर विमान ग्राऊंड (तांत्रिक बिघाड) झाल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली. दुरुस्तीनंतर विमानाचे उड्डाण होईल, असेही सांगण्यात आले. परंतु दुरुस्तीमध्ये रात्रीचे १० वाजले. विमान दुरुस्त होणार नसल्याचे लक्षात येताच प्रवाशांना विमान रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. तांत्रिक बिघाडामुळे विमान रद्द झाले, असे ट्रू जेटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुपारपासून विमानतळावरहैदराबादला डॉक्टरांची अपॉइंमेंट होती. त्यामुळे दुपारी ३ वाजता विमानतळावर आले. परंतु विमान खराब झाल्याचे सांगून रद्द झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गैरसोय झाल्याचे स्नेहा छाबडा यांनी सांगितले.
१७ आॅगस्टपर्यंत उड्डाण रद्दचिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारे ट्रू जेट कंपनीचे हैदराबाद-औरंगाबाद- हैदराबाद विमान रद्द होण्याचा प्रकार थांबत नाही. सलग सुट्या असताना १२ ते १७ आॅगस्टदरम्यान पुन्हा एकदा विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले.
ईदसाठी जायचे होतेभाचीला ईदसाठी हैदराबादला जायचे होते. तिचे आई-वडील हैदराबादला असतात. परंतु सहा तास बसवून ठेवल्यानंतर विमान रद्द झाल्याचे सांगितले. आता रेल्वे आणि इतर वाहतुकीच्या सुविधेने जाणेही अशक्य असल्याचे अॅड. मोहंमद वसीमउल्ला म्हणाले. यावेळी आई-वडिलांच्या ओढीने सदर युवतीला अश्रू आवरणे कठीण झाले होते.