औरंगाबाद - लोकमत समूहाचे कार्यकारी संचालक करण दर्डा यांच्या नेतृत्वाखालील औरंगाबाद आयकॉन संघाने जबरदस्त कामगिरी करताना एडीसीए स्टेडियमवर शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात असोसिएशन सिव्हिल इंजिनिअर प्रॅक्टिस संघावर ६ गडी राखून विजय मिळविताना राजुरी स्टीलतर्फे आयोजित राजुरी चषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. नीलेश मित्तलची सुरेख गोलंदाजी हे औरंगाबाद आयकॉन संघाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.
असोसिएशन सिव्हिल इंजिनिअर प्रॅक्टिस संघाने प्रथम फलंदाजी करताना १४.१ षटकांत ९ बाद ७८ धावा केल्या. त्यांच्याकडून मुजीब पठाण याने २६ चेंडूंत एका चौकारासह २० आणि कर्णधार नीरज देशपांडे याने १२ चेंडूंत २ चौकारांसह १४ धावांचे योगदान दिले. औरंगाबाद आयकॉन संघाकडून नीलेश मित्तल याने सुरेख गोलंदाजी करताना अवघ्या २.१ षटकांत फक्त ७ धावा देऊन ३ गडी बाद केले. त्याला प्रद्युम्न बजाजने १४ धावांत ३, लहरी वकीलने २० धावांत २ गडी बाद करून सुरेख साथ दिली. प्रत्युत्तरात औरंगाबाद आयकॉन संघाने विजयी लक्ष्य १४.१ षटकांत ४ गडी गमावून गाठले.
त्यांच्याकडून इब्राहिम अन्सारी याने स्फोटक फलंदाजी करताना अवघ्या १० चेंडूंतच ४ सणसणीत चौकारांसह सर्वाधिक २१ धाव केल्या. सुयोग माछरने २२ चेंडूंत एका चौकारासह १७, दलबीर सलुजाने १४ चेंडूंत एका चौकारासह १६ धावांचे निर्णायक योगदान दिले. असोसिएशन सिव्हिल इंजिनिअर प्रॅक्टिस संघाकडून राहुल स्वामीने ११ धावांत २ गडी बाद केले. ७ दिवस रंगलेल्या या स्पर्धेत चॅम्पियन औरंगाबाद आयकॉनसह क्रेडाई, आयआयए, राजुरी इलाईट, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, एसीईपी, आयएसएसई, मसिआ, इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्टर, स्टील ट्रेडर्स असे १0 संघ सहभागी झाले होते.
अंतिम सामन्यानंतर नीर्लेप अपलायन्सेसचे व्यवस्थापकीय संचालक मुकुंद भोगले, रुद्राणी इनफ्रास्टक्चरचे चेअरमन विवेक देशपांडे, लोकमत समूहाचे कार्यकारी संचालक करण दर्डा, राजुरी स्टीलचे संचालक दिनेश राठी यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या व उपविजेत्या संघांना गौरविण्यात आले. या प्रसंगी महावीर पाटणी (स्टील ट्रेडर्स असोसिएशन), अजय ठाकूर (आर्किटेक असोसिएशन माजी प्रेसिडेंट), सुनील कीर्दक (मसिआ प्रेसिडेंट), सुनील भाले (आर्किटेक्ट प्रसिडेंट), अजित मुळे (ग्रीन गोल्ड सीड्सचे कार्यकारी संचालक), विकास चौधरी (औरंगाबाद क्रेडाईचे उपाध्यक्ष), भूषण जोशी (आयएसएसईचे प्रेसिडेंट), रवींद्र करवंदे (औद्योगिक विकासक असोसिएशन प्रेसिडेंट), प्रमोद सावंत (एसीईपीचे माजी प्रेसिडेंट), बालाजी पाटील (निशा कन्स्ट्रक्शनचे संचालक) उपस्थित होते.ही स्पर्धा पंकज पांडे यांच्या मार्गदर्शनाखालील आयोजन समितीने यशस्वी केली.
स्पर्धेचे मानकरीमालिकावीर : मुजीब पठाणसामनावीर : नीलेश मित्तलफलंदाज : मोहित त्रिवेदीगोलंदाज : लहरी वकील.
संक्षिप्त धावफलकएसीई (पी) : १४.१ षटकांत ९ बाद ७८. (मुजीब पठाण २०, नीरज देशपांडे १४, नीलेश मित्तल ३/७, प्रद्युम्न बजाज ३/१४, लहरी वकील २/२०).औरंगाबाद आयकॉन : १४.१ षटकांत ४ बाद १७९. (इब्राहिम अन्सारी २१, सुयोग माछर १७, दलबीर सलुजा १६. राहुल स्वामी २/११, रंजन डागा १/५).