औरंगाबाद : जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत येण्यासाठीचा मुख्य रस्ता तयार होण्यापूर्वीच संचालकांमध्ये ‘दुभाजक’ बनला आहे. आजी सभापती विरोधात माजी सभापती व मनपा सदस्य असा वाद उफाळून आला आहे.
सभापती राधाकिसन पठाडे म्हणाले की, २१ मीटरच्या रस्त्याचा ठराव संचालकांनी संमत केला आहे, तर ‘बैठकीत २४ मीटरचा रस्ता तयार करणार, असा ठराव मांडला होता. नंतर पडद्यामागे तडजोड करून रस्ता लहान करण्यात आल्याचा आरोप माजी सभापती संजय औताडे यांनी केला. याचवेळी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना ‘तडजोडी’ची काय गरज, असा सवाल मनपा सदस्य त्र्यंबक तुपे यांनी उपस्थित केला. यामुळे रस्त्याचा वाद येत्या दिवसात आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.
‘रस्त्यासाठी २० एकरच्या तडजोडीचे गौडबंगाल’ अशी बातमी लोकमतच्या बुधवारच्या अंकात प्रसिद्ध झाल्यामुळे बाजार समितीत सुरूअसलेल्या ‘अर्थ’पूर्ण वाटाघाटी चव्हाट्यावर आल्या. औरंगाबाद तालुका बाजार समितीची जाधववाडीत १७५ एकर जागा आहे. त्यातील सर्व्हेनंबर १२ व सर्व्हेनंबर १३ मिळून २० एकरची जागा सध्या ‘पार्श्वनाथ रियाल्टी प्रा.लि’ च्या ताब्यात आहे. ही जळगाव रोडवरील मोक्याची जागा बाजार समितीला (शासनाला) परत मिळावी यासाठी मागील २५ वर्षांपासून वाद सुरू आहे. न्यायालयाने कधी बाजार समितीच्या बाजूने, तर कधी विरोधात निकाल दिला आहे. दोन्ही बाजूने वेळोवेळी या निर्णयाच्या विरोधात वरील न्यायालयात याचिका दाखल करून ‘स्थगिती’चा आदेश प्राप्त करून घेतला आहे. सध्या हे प्रकरण दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, सध्याचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी २८ डिसेंबर रोजी तातडीची बैठक बोलावून त्यात ‘तडजोडी’चा ठराव मांडला आणि पासही करून घेतला. यात माजी सभापती व मनपाचे बाजार समितीतील सदस्यांच्या विरोधाला न जुमानता हा ठराव मंजूर झाल्याने शाब्दिक वाद उफाळून आला.
आज राधाकिसन पठाडे यांनी प्रतिनिधीला सांगितले की, सर्व्हेनंबर १२ व १३ मधील तडजोडीचा मुद्दा प्रथम पार्श्वनाथ रियाल्टी प्रा.लि., ने बाजार समितीसमोर आणला. आम्ही त्यासंदर्भात संचालकांची बैठक बोलावली व तो ठराव सर्वांसमोर मांडला. सध्या या जागेवर सर्वोच्च न्यायालयाने स्टे मिळाला असला तरी यापूर्वी न्यायालयात बाजार समितीची बाजू कमजोर आहे. यामुळे संचालकांनी तडजोडीचा निर्णय पास केला आहे. २१ मीटर (सुमारे १ एकर) जमीन बाजार समितीच्या रस्त्यासाठी सोडण्यात येणार आहे. खरेदीखतही बाजार समितीच्या नावावर होणार आहे.
ठराव आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर मांडणार आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर अंमलबजावणी होईल. यावर माजी सभापती संजय औताडे यांनी आरोप केला की, बैठकीत २४ मीटर जागा रस्त्यासाठी मिळणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. बैठकीनंतर पडद्याआड सभापतीने २१ मीटर जागेवर तडजोड केली. यात बाजार समितीचे मोठे नुकसान झाले आहे. या तडजोडीत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असून, या ठरावाला स्थगिती मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
१ एकर जागेच्या बदल्यात २० एकर जागा देणे मूर्खपणा मनपाचे बाजार समितीमधील सदस्य त्र्यंबक तुपे यांनी आरोप केला की, बाजार समितीच्या रस्त्यासाठी १ एकर जागेच्या बदल्यात २० एकर जागा खाजगी बिल्डर्सच्या घशात घालणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा होय. हा बाजार समिती संचालकांचा प्रश्न नसून संपूर्ण शहराचा प्रश्न आहे. शासनाची कोट्यवधींची जागा आहे. यामुळे सभापतींनी विधानसभा अध्यक्ष, पालकमंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार, जिल्हाधिकारी व बाजार समितीचे संचालक यांची एकत्र बैठक बोलावणे अपेक्षित होते. यामुळे बाजार समितीला जास्त जागा मिळाली तर, शासनाची जागा वाचविण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत सभापतींना आम्ही कोणत्याही प्रकारची तडजोड करूदेणार नाही.