औरंगाबाद : जळगाव रस्त्यावरील अडथळे दूर करून हा महामार्ग येत्या ३० जानेवारीपर्यंत वाहतूकयोग्य करू, असे निवेदन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. १९) न्या. रवींद्र घुगे व न्या. संतोष देशमुख यांच्या खंडपीठात प्रत्यक्ष हजर राहून केले. या याचिकेवर ३ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
औरंगाबाद-अजिंठा-जळगाव रस्त्याच्या दुरवस्थेबाबत उच्च न्यायालयासमक्ष दाखल सु-मोटो रिट याचिकेवरील सुनावणीप्रसंगी ११ जानेवारी रोजी खंडपीठाने जळगाव आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी यांनी याबाबत सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने संबंधित जबाबदार अधिकारी यांनी पुढील तारखेस उपस्थित राहावे, असा आदेश दिला होता. त्यानुसार अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष हजर राहून वरीलप्रमाणे निवेदन केले; तसेच या मार्गावर सूचनाफलकही लावण्यात येतील, असेही निवेदन केले.
न्यायालयाचे मित्र ॲड. चैतन्य धारूरकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ॲड. भूषण कुलकर्णी, नागरी विमान उड्डायन प्राधिकरणाच्या वतीने ॲड. नितीन चौधरी, कंत्राटदाराच्या वतीने ॲड. अभिजित दरंदले व ॲड. प्रवीण दिघे, शासनाच्या वतीने ॲड. ज्ञानेश्वर काळे व ॲड. सुजित कार्लेकर काम पाहत आहेत.