औरंगाबाद: देशातील पहिला इंटीग्रेटेड सिटी प्रोजेक्ट ऑरिक सिटी औरंगाबादमध्ये आहे. येथे उद्योगांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. यापुढे गुंतवणुकीचा पुढील टप्पा मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना असणार आहे. राज्याचे औद्योगिक भविष्य ऑरिक सिटी आहे. येथे गुंतवणुकीसाठी अनेक उद्योजक सकारात्मक आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी इन्व्हेस्टर राउंड टेबल कार्यक्रमाचे मंत्री पियुष गोयल यांच्या पुढाकाराने आज मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
फडणवीस पुढे म्हणाले, महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी अनेक उद्योजक पुढे येत आहेत. विशेषतः मराठवाड्यात आणखी गुंतवणूक वाढावी यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या पुढाकाराने इन्व्हेस्टर राउंड टेबल कार्यक्रम घेण्यात आला. यात देश विदेशातील गुंतवणूकदार आले होते. राज्य सरकार मराठवाड्यातील गुंतवणुकीसाठी आग्रही आहे. येथे ऑरिक, शेंद्रा एमआयडीसी, ड्राय पोर्ट अशा सुविधा उपलब्ध आहेत. औरंगाबाद आणि जालन्यात येणाऱ्या या इंडस्ट्रीअल भागात सर्व सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे भविष्यातील गुंतवणुकीचा पुढचा टप्पा औरंगाबाद जालना असतील, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
औरंगाबाद, जालना गुंतवणुकीसाठी भविष्य राज्यात येणाऱ्या उद्योजकांसाठी औरंगाबाद आणि जालन्यात सर्व सुविधा उपलब्ध असणारी मोठी जागा आहे. राज्यातील गुंतवणुकीसाठी ऑरिक, शेंद्रा-बिडकीन, ड्रायपोर्ट भविष्य आहेत. हा भाग समृद्धी महामार्गास जोडलेला आहे. ऑरिक, ड्रायपोर्टमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंवणूक होईल. यासाठी देश विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात आले आहे. फक्त नवीन प्रकल्प, गुंतवणूक येताच त्यात राजकारण आणू नये. रिफायनरीस विरोध होत आहे. तसा मोठा प्रकल्पांना विरोध होऊ नये, असे आवाहनही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.