औरंगाबाद : माजी नगरसेवक सलीम कुरैशी यांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गँगस्टर इम्रान मेहदीवर सोमवारी (दि.२९) न्यायपालिकेच्या आवारात हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यावरून सलीम कुरैशी व इम्रान मेहदी यांच्या नातेवाईकांत दोन्ही गटांकडून न्यायालयाच्या आवारातच तुफान दगडफेक झाली. हा सर्व प्रकार न्यायालयाच्या आवारातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे़ त्याआधारे पोलिसांनी दगडफेक आणि मारहाण करणार्या टोळक्यांवर दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत. अटकसत्र मोहिमेत चार पथके कामाला लागली आहेत.
माजी नगरसेवक सलीम कुरैशी यांचे (मार्च २०१२) साली अपहरण करून अत्यंत क्रूरतेने कुख्यात गँगस्टर इम्रान मेहदी याने त्यांची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले. सलीम कुरैशी यांच्यासह इम्रान मेहदी याने साथीदारांच्या मदतीने आणखी पाच जणांची हत्या केल्याचे त्यावेळी उघडकीस आले होते. सध्या इम्रान मेहदीवर मोक्का लावण्यात आला असून, त्याला सुनावणीसाठी सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जिल्हा व सत्र न्यायालयात आणण्यात आले होते. सुनावणी झाल्यावर इम्रान मेहदीला परत नेत असतानाच सलीम कुरैशी व इम्रान मेहदीच्या नातेवाईकांत शाब्दिक चकमक झडली होती. त्यानंतर दोन्ही गटांकडून परस्परांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे न्यायालयाच्या आवारात काही काळ खळबळ उडाली होती. बंदोबस्तावरील पोलिसांनी घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला दिल्यावर वरिष्ठ अधिकार्यांसह गुन्हे शाखेच्या कर्मचार्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते.
दगडफेकीतील आरोपी पसार झाल्याने पोलिसांनी न्यायालयाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज तपासणीसाठी ताब्यात घेतले़ त्यानुसार पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखा, क्रांतीचौक, वेदांतनगर आणि बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पथक तैनात केली आहे. या पथकाने सोमवारी रात्री उशिरा ५ तरुणांना ताब्यात घेतले होते़ मंगळवारी (दि़.३०) धरपकड सुरूच होती. दुपारी ३.३० वाजेपर्यंत १२ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली. या प्रकरणात बेगमपुरा, क्रांतीचौक आणि वेदांतनगर पोलीस ठाण्यांत आरोपींवर दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़
न्यायालयाच्या आवारात दगडफेक व हाणामारीप्रकरणी अर्शद अब्दुल हमीद कुरेशी (रा.सिल्लेखाना)आणि मोहम्मद खालेद मोहम्मद अजहर (२७,रा. आसेफिया कॉलनी) यांच्यावर दोन गटांकडून दिलेल्या तक्रारींवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मेहदी गटाच्या ६ जणांना अटक केली असून, ३ जण फरार आहेत. कुरेशी गटाच्या ४ जणांना अटक केली, तर ५ जणांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार डी. बी. कोपनर, चौधरी तपास करीत आहेत.