संतोष हिरेमठ
औरंगाबाद : साधारण १५ वर्षांपूर्वी न मिळाणारे लाइफ सेव्हिंग उपचार आता औरंगाबादेत सहज मिळत आहेत. औरंगाबादकरांना पुणे, मुंबई, हैदराबादला जाण्याची फारशी गरज उरलेली नाही. हृदयाच्या शस्त्रक्रिया, हृदय, यकृत, किडनी प्रत्यारोपण, गॅस्ट्रोएंटरोलॉजी, कॅन्सरवरील अत्याधुनिक उपचार, टेस्ट ट्यूब बेबी आदी अत्याधुनिक उपचार सुविधा शहरात उपलब्ध झाली आहे. परिणामी ‘मेडिकल हब’च्या दिशेने औरंगाबादने झेप घेतली आहे.
लाइन सेव्हिंग उपचारासाठी पुणे, मुंबई, नागपूरनंतर औरंगाबादचे नाव पुढे येते. औरंगाबादेत सुपरस्पेशालिस्ट आणि तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या वाढत आहे. उद्योगनगरी, शैक्षणिकनगरी, पर्यटनाची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबादने आता आरोग्य सुविधांसाठी ओळख निर्माण केली आहे. मराठवाड्यासह विदर्भातून आणि खान्देशातून सर्वसाधारण आजारापासून ते दुर्धर आजारांचे रुग्ण विविध उपचारांसाठी येतात. औरंगाबादेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (घाटी), ५० ते २०० खाटांची क्षमता असलेले ५० पेक्षा अधिक खासगी रुग्णालये आहेत. तज्ज्ञ डॉक्टर आहेत. गोरगरीब रुग्णांसाठी घाटी रुग्णालय आधारवड ठरत आहे. कर्करोगाच्या रुग्णांना राज्य कर्करोग संस्था म्हणजे शासकीय कर्करोग रुग्णालय आशेचा किरण ठरत आहे. हे रुग्णालय मराठवाड्यासह हळूहळू राज्यातील व राज्याबाहेरील कर्करुग्णांसाठी फार मोठा आधारस्तंभ ठरत आहे. अतिशय अद्ययावत उपकरणांनी परिपूर्ण असलेल्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये विविधांगी व नवनवीन उपचार, शस्त्रक्रियांसह अनेक विभाग कार्यान्वित झाले. सध्या सुरू असलेल्या विस्तारीकरणामुळे त्यात आणखी वाढ होणार आहे. शहरातील खाजगी रुग्णालयांतही कॅन्सर रुग्णांवर उपचार होत असून सर्जिकल ऑन्कोलॉजी, मेडिकल ऑन्कोलॉजी आणि रेडिएशन ऑन्कोलॉजीही उपलब्ध आहे. औरंगाबादेत काॅप्रेरेट रुग्णालयेही सुरू झाली आहेत. परदेशातून खास उपचारासाठी रुग्ण दाखल होतात. कोरोनाकाळात त्यात काहीसा खंड पडला असला तरी भविष्यात मेडिकल टूरिझममध्ये मोठी वाढ होईल, अशी आशा तज्ज्ञांनी वर्तविली.
किडनीपाठोपाठ हृदय, यकृत प्रत्यारोपण
औरंगाबादेत १५ जानेवारी २०१६ रोजी पहिले अवयदान झाले आणि मराठवाड्यात अवयवदानाच्या चळवळीला सुरुवात झाली. त्यानंतर फेब्रुवारी २०१७ मध्ये पहिले हृदय प्रत्यारोपण झाले, तर २५ नाेव्हेंबर २०१७ रोजी पहिले यकृत प्रत्यारोपण करून मराठवाड्याने वैद्यकीय क्षेत्रात नवीन इतिहास रचला. प्रत्यारोपणासाठी अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यातील शेकडो रुग्णांच्या आयुष्यात उजाडलेली ही नवीन पहाट ठरली. अवयवदान आणि प्रत्यारोपणातून अनेकांना जीवदान मिळाले. कोरोनामुळे अवयवदानात खंड पडला आहे; पण लवकरच अवयव प्रत्यारोपण पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
-----
औषधींसह मेडिकल डिव्हाइस निर्मिती
औरंगाबाद औद्योगिक वसाहतीमध्ये ६५ पेक्षा जास्त फार्मास्युटिकल कंपन्या आहेत. त्यातील अनेक उद्योगांची औषधी जगभर निर्यात होते. याशिवाय सर्जिकल साहित्य, वैद्यकीय क्षेत्रासाठी लागणाऱ्या अन्य वस्तू उत्पादित करणारे उद्योग आहेत. कोरोनाकाळात मेडिकल डिव्हाइस निर्मितीवर चांगले काम सुरू झाले आहे. ऑक्सिजन सॅच्युरेशन माेजणाऱ्या पल्स ऑक्सिमीटरची निर्मिती शेंद्रा येथे होत आहे.
-------
लाइफ सेव्हिंग उपचार
औरंगाबाद मेडिकल हब बनण्याच्या दिशेने जात आहे. आगामी ५ वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती होईल. अनेक उपचारांत खूप चांगले काम होत आहे. कार्डियालाॅजी, गॅस्ट्रोएंटरोलॉजी, किडनी प्रत्यारोपण याबाबतीत मोठे काम होत आहे. ज्यासाठी पूर्वी पुणे, मुंबई, नागपूर, हैदराबाद येथे जावे लागत होते, असे लाइफ सेव्हिंग उपचार शहरात होत आहेत. औरंगाबादेत सेंटर ऑफ एक्सलेन्सची गरज असून, त्यात आता पुढे जात आहोत.
- डाॅ. हिमांशू गुप्ता, अध्यक्ष, मराठवाडा हाॅस्पिटल असोसिएशन
---
औरंगाबादची नवी ओळख
औरंगाबाद शहर हे मेडिकल हब झालेले आहे, असे वाटते. औरंगाबाद हे मराठवाड्याचे केंद्र आहे. त्यामुळे मराठवाड्यातील रुग्ण येथे येणे साहजिक आहे; पण देशभरासह परदेशातील नागरिकांनी येथे येऊन उपचार घेतले तर मेडिकल हब म्हणता येते. मुंबई, पुणे ही शहरे मेडिकल हब म्हणून ओळखली जातात; पण औरंगाबादचीही आता हीच ओळख निर्माण झाली आहे. तसेच होत आहे. स्पेशालिटी सेंटर्सही सुरू होत आहे.
- डाॅ. संतोष रंजलकर, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)