छत्रपती संभाजीनगर : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजवर झालेल्या लोकसभेच्या सर्वच्या सर्व सतरा निवडणुका लढविलेल्या काँग्रेस पक्षाचा उमेदवार यावेळी पहिल्यांदाच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात नसेल. महाविकास आघाडीत ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गेल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आजवर ज्यांच्याशी लढत दिली, त्या उद्धवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा प्रचार करावा लागणार आहे, हेही विशेष!
लोकसभेच्या १९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये औरंगाबाद मतदारसंघातून काँग्रेसचे सुरेशचंद्र आर्या हे ७१ हजार ९२ मते घेऊन विजयी झाले होते. त्यांनी पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार एस. के. वैशंपायन यांचा ३५ हजार २२३ मतांनी पराभव केला होता. आजपर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसचा उमेदवार निवडणूक रिंगणात असायचा. यंदा मात्र महाविकास आघाडीसोबत असल्यामुळे प्रथमच काँग्रेसच्या उमेदवाराशिवाय ही निवडणूक होणार आहे.
१९५७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून स्वामी रामानंद तीर्थ यांना औरंगाबादचे खासदार म्हणून मतदारांनी निवडले होते. १९६२ आणि १९६७ साली झालेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार भाऊराव दगडूराव देशमुख यांनी विजय संपादन केला होता. तर १९७१ साली काँग्रेसचे माणिकराव पालोदकर यांनी जनसंघाचे उमेदवार रामभाऊ गावंडे यांचा पराभव केला होता. १९७७ साली मात्र बापूसाहेब काळदाते यांनी काँग्रेस उमेदवार चंद्रशेखर राजूरकर यांचा पराभव केला होता. १९८० साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सलीम काझी यांना उमेदवारी दिली. काझी यांनी या निवडणुकीत एस. काँग्रेसचे उमेदवार साहेबराव पा. डोणगावकर यांचा पराभव केला होता. तर १९८४ च्या निवडणुकीत साहेबराव पा. डोणगावकर यांनी इंदिरा काँग्रेसचे उमेदवार अब्दुल अजीम यांचा पराभव करून मागील निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला. १९९८ आणि २०१९ चा अपवाद वगळला तर १९८९ पासून या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला आहे. म्हणूनच हा मतदारसंघ सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.
१९८९ साली शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार मोरेश्वर सावे यांनी सुरेश पाटील यांचा पराभव करून सेनेच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली. १९९१ सालीदेखील सावे निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या प्रा. मोहन देशमुख यांचा पराभव केला होता. १९९६च्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांनी काँग्रेस उमेदवार सुरेश पाटील यांचा पराभव केला होता. मात्र १९९८ च्या निवडणुकीत काँग्रेसचे रामकृष्णबाबा पाटील यांनी शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांचा पराभव केला होता.
आता शिवसेना उमेदवाराचा प्रचार१९९९, २००४, २००९ आणि २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांनी सलग चारवेळा काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम उमेदवार इम्तियाज जलील यांनी खैरे यांचा पराभव केला. काँग्रेसचे सुभाष झांबड यांना चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती.