छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, दि. ४ जून रोजी होणार आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एमआयटी महाविद्यालय, बीड बायपास येथे सकाळी ८ वाजेपासून होणार आहे. या मतमोजणीसाठी निवडणूक विभागाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. त्यात कन्नड, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व, गंगापूर, वैजापूर असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतांची मोजणी करण्यासाठी १४ टेबल लावले आहेत. ७ टेबलची एक रांग अशा दोन रांगा असतील.
सहा विधानसभा क्षेत्रासाठी ८४ टेबल असतील. एका टेबलवर रो ऑफिसर ते सारणी भरणारे चमू असे एकूण १०४ कर्मचारी नियुक्त असतील, तर टपाली मतांच्या मोजणीसाठी १० टेबल असून ६८ कर्मचारी नियुक्त केले आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे रोज मतमोजणी केंद्र व स्ट्राँग रूमला भेट देऊन आढावा घेत आहेत.
मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण २७ मे रोजी झाले आहे. सोमवार ३ जून रोजी निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत दुसरे विधानसभा मतदारसंघनिहाय प्रशिक्षण होईल. त्यानंतर मंगळवार ४ रोजी प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी तिसरे टेबलनिहाय प्रशिक्षण होईल. मंगळवार ४ जून रोजी पहाटे ५ वा. रॅण्डमायझेशन होईल. ६:३० वा. कर्मचारी मिळालेल्या टेबलवर जातील. तेथे मोजणी साहित्याची तपासणी करतील. सकाळी ८ वा. टपाली मतमोजणीला सुरुवात होईल. सकाळी साडेआठ वा. मतदान यंत्रांची मतमोजणी सुरू होईल.
दांडे आणि शर्मा असतील निरीक्षक...मतमोजणीसाठी दोन निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यात कन्नड, औरंगाबाद (मध्य), औरंगाबाद (पश्चिम) या तीन विधानसभा क्षेत्रासाठी कांतीलाल दांडे, हे तर औरंगाबाद(पूर्व), गंगापूर, वैजापूरसाठी किशोरीलाल शर्मा हे निरीक्षक आहेत.