औरंगाबाद, दि. 30 : पावसाने जिल्ह्यातील झेंडू खराब झाल्याने झेंडूचे भाव गगणाला जाऊन भिडले होते. दरवर्षी ३० ते ५० रुपये किलोपर्यंत मिळणारा झेंडू यंदा दस-याच्या दिवशी चक्क २०० ते २५० रुपयांपर्यंत जाऊन पोहचला होता. पहिल्यांदाच झेंडूला एवढा विक्रमी भाव मिळाला. स्थानिक थोडेफार शेतकरी वगळता परजिल्ह्यातून आणून झेंडू शहरात विक्री करणा-या व्यापा-याचा यात फायदा झाला.
यंदा सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील झेंडू काळवटला होता. यामुळे रंगदार झेंडू भाव खाऊन गेला. जिल्ह्यातील झेंडूची बिकट परिस्थिती लक्षात घेता चाणाक्ष व्यापाºयांनी हिंगोली, परभणी, जळगाव जिल्ह्यातून झेंडू आणून येथे विकला. दस-याच्या आदल्या दिवशी ८० ते १०० रुपये किलोने झेंडू विकला जात होता पण आज दस-याला सकाळी नगरहूनही झेंडूची कमी आवक झाल्याने. झेंडूचे भाव वाढून २०० रुपये तर काही भागात २५० रुपये किलोपर्यंत विकल्या गेला. एवढेच काय पण दुपारी १ वाजेपर्यंत मुकूंदवाडी, चिकलठाणा, जालना रोड, शहागंज, सिडको-हडको, बीडबायपासरोड परिसरात रस्त्यावर ढिगार मांडून बसलेल्या विक्रेत्यांकडील झेंडू संपली होती.
दुपार नंतर भाव कमी होतील, या आशेने अनेक जण जेव्हा दुपारी खरेदीला बाहेर पडले तेव्हा त्यांना झेंडूचे दर्शनही झाले नाही. सर्वत्र आपट्याची पाने विकणारे विक्रेते दिसून येत होते. या भाववाढीचा फायदा काही शेतक-यानाच झाला पण या ‘व्यापा-यानी’ चांदी करुन घेतली. परजिल्ह्यातून झेंडू आणून येथे विक्री करणा-या व्यापा-यांनी तिप्पट नफा कमविला,हेच यामागील सत्य होय.
दरवाजावर आंब्याच्या पानाचे तोरणझेंडूचे भाव २०० ते २५० रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचल्याने ग्राहकांचे डोळे पांढरे झाले होते. अनेकांनी झेंडू सोडून दिला व घराच्या दरवाजावर आंब्याच्या पानाचे तोरण बांधण्यातच त्यांनी धन्यता मानली. सिडको-हडको, शिवाजीनगर, पुंडलिकनगर शहरातील अन्य मध्यमवर्गीय वसाहतीमध्ये अनेकांच्या घराच्या दरवाजावर आंब्याच्या पानाचे तोरण बघण्यास मिळाले.