औरंगाबाद : दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी होत असतानाच मंगळवारी रात्री मस्तावलेल्या हेल्याने धुमाकूळ घातल्याने अनेकांची धांदल उडाली. काही युवक त्याच्या पाठीमागे वाहने पळवीत असल्याने तो अधिकच बिथरला होता. हेला अचानक हल्ला करेल या भीतीने नागरिकांची धावपळ उडाली. यामुळे बाजारपेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यात काही नागरिक किरकोळ जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारात कपडे व इतर साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. त्यातच मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास नागरिक खरेदीत मग्न असताना गुलमंडी येथे अचानक एक हेला वेगात आला. लोक मोठ्याने आरडाओरड करू लागले. कोणाला काहीच कळेना. अनेक जण दुकानात शिरले, तर काही जण जिथे उंच ओट्यावर जागा दिसेल तिथे जाऊन उभे राहिले. या प्रकारामुळे गोंधळ उडाला होता. कोणी तरी हेल्याला दारू पाजली, असे प्रत्यक्षदर्शी सांगत होते. तो गुलमंडी, दिवाणदेवडी, केळीबाजार, सिटीचौक, मछलीखडक या मार्गावर सैरावैरा पळत होता.
अवघ्या एक तासात त्याने या परिसराला ४ फेऱ्या मारल्या. १० ते १५ दुचाकीस्वार त्याचा पाठलाग करीत होते. ‘हटो हटो’ असे म्हणत ते लोकांना सावध करीत होते. मात्र, त्यांच्या ओरडण्याने व पाठलाग करीत असल्याने हेला अधिकच बिथरला होता. तो आणखी वेगाने रस्त्यावरून धावत होता. यात काही नागरिक रस्त्यावर पडले. मात्र, किती जण जखमी झाले, याची माहिती मिळू शकली नाही. रात्री ९.४५ वाजेपर्यंत हेल्याचा धुमाकूळ सुरू होता.
यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. प्रत्यक्षदर्शी म्हणाले की, या हेल्याच्या पाठीमागे युवक दुचाकी घेऊन लागले होते. यामुळे तो बिथरला होता. युवक त्याच्या पाठीमागे लागले नसते तर तो कुठे तरी एका जागेवर थांबला असता. या हेल्याचा मालक कोण आहे, हे कळू शकले नाही. मुख्य बाजारपेठेत हेला रात्री धुमाकूळ घालत असताना पोलीस मात्र, दिसून आले नाही, असेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
व्यापाऱ्यांना फटकाव्यापारी तेजपाल जैन यांनी सांगितले की, हेल्याच्या दहशतीमुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी बाजारातून काढता पाय घेतला. ग्राहकी पांगल्याने याचा फटका येथील व्यापाऱ्यांना बसला.