औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या दिवशी सोमवारी मतदान केंद्रांवर कमी, पण बाजारपेठेत जास्त गर्दी झाली होती. मतदानापेक्षा अनेकांनी दिवाळीच्या खरेदीला प्राधान्य दिल्याचे दिसले. सकाळपासूनच ग्राहकांची कपडे खरेदीसाठी वर्दळ वाढली होती. काही जण मतदान करून खरेदीसाठी आले होते.
‘तुम्ही सुजाण नागरिक आहात, आता सुजाण मतदारही व्हा’, ‘ लोकशाहीचा बाळगू अभिमान चला करू मतदान’, ‘छोडकर सारे काम, चलो करे मतदान’ मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अशा घोषवाक्यांद्वारे मतदारांना मागील महिनाभर आवाहन करण्यात येत होते. यामुळे यंदा मतदानाची टक्केवारी वाढणार असे सर्वांचे मत होते. मतदानासाठी बहुतांश कारखाने, महाविद्यालय, सरकारी, निमसरकारी, खाजगी कार्यालयांना सुटी देण्यात आली होती. मतदानामुळे सोमवारी दिवसभर बाजारपेठेत गर्दी कमी राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, आज प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच दिसून आली.
दिवाळी तोंडावर आल्याने व सुटीचा फायदा घेत सकाळी १० वाजेपासून बाजारात ग्राहकांनी खरेदीला सुरुवात केली होती. त्याच वेळी अनेक मतदान केंद्रात मतदारांची तुरळक गर्दी होती. गुलमंडी, मछली खडक, सिटीचौक, टिळकपथ, पैठणगेट, औरंगपुरा, कुंभारवाडा या शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत गर्दी होती. शिवाय त्रिमूर्ती चौक, पुंडलिकनगर, गारखेडा, शिवाजीनगर, सिडको-हडकोतील कपड्यांच्या दुकानातही गर्दी पाहण्यास मिळाली. दुपारनंतर बाजारपेठेत गर्दी आणखी वाढली होती. अनेक दुकानांतील कामगारांना चहा पिण्यासही वेळ मिळाला नाही.
मुलांच्या रेडिमेड कपड्यांसाठी प्रसिद्ध काही दुकानाबाहेर तर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. कपडे खरेदीसाठी रांगेत उभ्या असलेल्या काही ग्राहकांशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला तेव्हा काही ग्राहकांनी सकाळीच मतदान करून नंतर खरेदीसाठी आल्याचे सांगितले. काही ग्राहकांनी सांगितले, मतदानामुळे सकाळी दुकानात गर्दी कमी असेल हे लक्षात घेऊन आम्ही खरेदीसाठी आलो व दुपारी ३ वाजेनंतर मतदानासाठी जाणार आहोत. आज ग्राहकांची गर्दी लक्षात घेता व मतदानासाठी कर्मचाऱ्यांना एकानंतर एक सोडावे लागत असल्याने दुकानदारांना कमी कर्मचाऱ्यांमध्ये ग्राहकी सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागली. एकीकडे मतदानाची टक्केवारी वाढत नसल्याने उमेदवार व कार्यकर्ते चिंता करीत होते तर दुसरीकडे एवढी गर्दी वाढली की, दुपारी ४ वाजेनंतर मध्यवर्ती बाजारपेठेत सतत वाहतूक जाम होत राहिली.
रेडिमेड कपड्यांशिवाय, आकाश कंदिल, विद्युत रोषणाई, केरसुनी, शोभेच्या वस्तू, बत्ताशे, साळीच्या लाह्या आदी पूजेचे साहित्यही खरेदी केले जात होते. श्रमपरिहारासाठी हॉटेलमध्ये तसेच हातगाड्यांवरही विविध पदार्थांचा परिवारासह आस्वाद घेताना ग्राहक दिसून आले. सायंकाळनंतर आणखी गर्दी वाढली ती रात्री १० वाजेपर्यंत टिकून होती.
पाऊस उघडल्याने बाजारात लगबगरविवारी ढगाळ वातावरण व दुपारी पडलेल्या पावसाने ग्राहकीवर परिणाम झाला होता. मात्र, सायंकाळनंतर पावसाने उघडीप दिल्याने वर्दळ वाढली होती. मात्र, रात्री ९ वाजेनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने ग्राहकांनी घराचा रस्ता धरला होता. सोमवारी मात्र, दिवसभर पावसाने उघडीप दिली होती. यामुळे ग्राहकांनी सोमवारी जोमात खरेदी केली. ज्यांची रविवारी खरेदी अपूर्ण राहिली त्यांनी आज खरेदी पूर्ण केली.