- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : शहरातील विविध भागांत, काही ठिकाणी गल्लीबोळात आॅनलाईन लॉटरीचे अमाप पीक आले आहे. परंतु या पडद्याआड ‘मुंबई, कल्याण, मिलन, राजधानी, श्रीदेवी ’ अशा विविध नावाने मटका अड्डे सुरू असल्याचे लोकमतने रविवारी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये समोर आले. विशेष म्हणजे या अड्ड्यांवर आॅनलाईन लॉटरीसारखी मटक्याची नावे आणि आकड्यांचे फलक दर्शनी भागावर बिनधास्त लावलेले आहेत.
शहरात आॅनलाईन लॉटरीच्या नावाखाली सुरू असलेले चक्री जुगार अड्डे मार्च महिन्यात लोकमतने उघडकीस आणले होते. या वृत्तानंतर आॅनलाईन चक्री जुगार अड्डे झटपट बंद करण्यात आले होते. आता चक्री जुगार पुन्हा सुरू झाला असून, त्याच्यासोबत जिन्सी परिसर, नारेगाव, रेल्वेस्टेशन येथे थेट ओट्यावर बसून मटक्याची बुकिंग घेतली जाते. शहागंज भाजीमंडई, पुंडलिकनगर रोडवरील एका हॉटेलशेजारी असलेल्या लॉटरी सेंटरमध्ये मुंबई, कल्याण, श्रीदेवी मटका, कल्याण मटका अड्डे बिनधास्तपणे सुरू झाले आहेत.
शहराप्रमाणेच वाळूज एमआयडीसी, पंढरपूर, रांजणगाव शेणपुंजी आणि कमळापूर येथे मटका अड्डे सुरू आहेत. रांजणगाव शेणपुंजी येथे एका औषधी दुकानाच्या बाजूला आणि मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूच्या गल्लीत आॅनलाईन लॉटरीच्या दुकानात ‘मुंबई-कल्याण फन टार्गेट’ असा मटका चालविला जात आहे. तर पंढरपुरात मिठाईच्या दुकानाशेजारी आणि मागील गल्लीत लॉटरी सेंटरमध्ये खुलेआम मटका खेळविण्यात येत असल्याचे स्टिंगमध्ये दिसून आले.
अड्ड्यात आकड्यांच्या पाट्यामटका अड्डे चालविणाऱ्यांना पोलिसांची कोणतीही भीती नसल्याचे दिसले. या अड्ड्यात भिंतीवर मटका आकड्यांच्या निकालाच्या पाट्या दर्शनी ठिकाणी लावलेल्या आहेत. विशेष म्हणजे अशा पाट्या अनेक अड्ड्यांवर दिसल्या. अन्य दुकानांप्रमाणे तेथे जुगाºयांकडून पैसे घेऊन मटका आकड्यांची बुकिंग घेतली जाते. त्यांना रीतसर आकड्यांच्या चिठ्ठ्या दिल्या जात असल्याचे दिसून आले.असे केले स्टिंगपंढरपूर, रांजणगाव आणि कमळापूर रस्त्यावरील आॅनलाईन लॉटरीच्या दुकानात सदर प्रतिनिधीने प्रवेश करताच त्यांना पाहून तेथील काऊंटरवर बसलेल्या तरुणाने इशाऱ्यानेच खुणावून विचारले, बोला कोणता आकडा लिहू, बोला पटकन, नाही तर टाईम निघून जाईल? सदर प्रतिनिधींनी त्यास शंभर रुपये दिले. त्याने लगेच एका चिठ्ठीवर आकडे लिहून दिले. तासाभरानंतर निकाल लागेल, असे तो म्हणाला.
चक्री जुगाराचाही पर्याययाच अड्ड्यावर एक तरुण पैसे घेऊन संगणकाच्या माध्यमातून आॅनलाईन फन टार्गेट नावाचा चक्री जुगार खेळवीत असल्याचे दिसले. हा जुगार कसा खेळला जातो, असे त्यास विचारल्यानंतर त्याने तुम्ही लावलेला आकडा राऊंडनंतर आला तर तुम्ही विनर होऊ शकता, असे तो म्हणाला. दहा रुपये लावले आणि जिंकला तर ९० रुपये मिळतात, असे सांगून त्याने एक गेम खेळायला लावला. मात्र नशिबाने धोका दिल्याने सदर प्रतिनिधीने लावलेले ५० रुपये बुडाले. या चक्र ी जुगाराचे छायाचित्र त्याच्यासमोर मोबाईलवर घेतले तरी त्याने कोणताही आक्षेप घेतला नाही.