- रुचिका पालोदकर
औरंगाबाद : प्रत्येकीची नवी व्यथा आणि वेगळी कथा. कोण-कुठल्या त्या सगळ्या जणी तेथे एकत्र आल्या. प्रत्येकीवर ओढवलेली परिस्थिती नाईलाजाने त्यांना तिथे घेऊन आली खरी, पण आता मात्र त्या एकमेकींमुळे हसणे शिकल्या, एकमेकींचा आधार बनल्या आणि एकमेकींच्या सोबतीने जगणे शिकल्या. येशूच्या प्रांगणात आणि मदर तेरेसा यांचा वारसा चालविणाऱ्या ‘सिस्टर’च्या सहवासामुळे शहरातील मदर तेरेसा आश्रम जणू ‘जगी ज्यास कुणी नाही’ अशा महिलांसाठी आधारवड बनला आहे.
सेंट अॅन रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावर अलीकडेच निळ्या रंगाचे प्रवेशद्वार लक्ष वेधून घेते. बाहेरून पाहतानाही आतली निरव शांतता, शिस्तीत लावलेली झाडे आणि झाडांवर फुललेली वेगवेगळ्या रंगांची फुले मनाला प्रसन्न करून जातात. आत गेल्यावर सगळ्यात पहिले दिसणारा मदर तेरेसा यांचा शांत भाव असणारा पुतळा हाच या आश्रमातील सुप्त ऊर्जा असल्याचे सांगून जातो. मिशनरीज आॅफ चॅरिटीच्या या मदर तेरेसा आश्रमात आजघडीला विविध आजारांनी ग्रासलेल्या १२० निराधार स्त्रिया राहत असून, ६ सिस्टर त्यांची अविरतपणे देखभाल करतात.
आश्रमाविषयी सांगताना तेथील व्यवस्थापिका सिस्टर अंजली म्हणाल्या की, २५ वर्षांपूर्वी औरंगाबादचा हा आश्रम उभा करण्यात आला. पूर्वी येथे पुरुषांचीही सेवासुश्रूषा केली जायची; परंतु आता विभाजन झाले असून, पुरुषांना अन्य शहरांतील आश्रमात पाठविण्यात आले आहे. आता या आश्रमात केवळ महिलांची देखभाल केली जाते. ज्या महिलांना कुणाचाही आधार नाही, ज्यांना नातेवाईक असूनही विचारत नाही, अशा परिस्थितीतल्या आजारी महिलांवर पैशाअभावी किंवा अन्य कारणांमुळे कोणत्याही रुग्णालयात इलाज होत नाहीत. अशा महिलांसाठी हा आश्रम असून, याठिकाणी या महिलांवर मोफत इलाज केले जातात. त्यांची सुश्रूषा केली जाते. बरे वाटायला लागल्यावर काही जणी आपापल्या गावी, नातेवाईकांकडे निघून जातात, तर ज्यांचे कुणीही नाही, अशा महिला याच आश्रमात राहतात.ठरविलेले डॉक्टर नियमित येऊन या महिलांची तपासणी करतात. याठिकाणी तीन ते चार वार्ड असून, यामध्ये रुग्णांवर उपचार केले जातात. ज्यांची तब्येत थोडी बरी आहे, अशा महिला दुसऱ्यांची सुश्रूषा करण्यासाठीही मदत करतात. एवढे रुग्ण याठिकाणी राहतात, तरी येथे कमालीची स्वच्छता जपली जाते आणि आश्रमाची शिस्त सांभाळली जाते.
आज सगळीकडे नाताळाची धामधूम सुरू आहे. कपडे, शोभेच्या वस्तू, मिठाईची दुकाने यामुळे सगळी बाजारपेठच सजली असून, सगळीकडे जोरदार खरेदी सुरू आहे. त्या तुलनेत नाताळ सण साजरा करायला या महिलांकडे फार काही साधने उपलब्ध नाहीत; पण तरी ‘येशू बाबा’च्या मूर्तीसमोर आम्हीही एकमेकींसोबत नाताळ साजरा करणार असल्याचे या महिलांनी आवर्जून सांगितले.
आम्हीच त्यांच्या ‘माँ’यापैकी अनेक जणी अशा आहेत, ज्यांना आईचे प्रेम माहितीच नाही. अगदी लहान वयापासूनच इथे आलेल्या काही जणी आहेत त्यांना आम्हीच त्यांच्या जवळचे वाटतो. त्यांच्या लेखी आम्हीच त्यांचे पालक असून, त्या आम्हालाच ‘माँ’ म्हणून हाक मारतात, असे सिस्टर अंजली यांनी सांगितले.