‘वंचित बहुजन आघाडी-एमआयएम’मुळे औरंगाबाद महापालिकेत युतीला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 07:15 PM2019-06-01T19:15:03+5:302019-06-01T19:18:18+5:30
६५ ते ७० नगरसेवक निवडून येण्याची क्षमता
औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी-एमआयएमला लोकसभा निवडणुकीत शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांतून २ लाख ६२ हजार मते मिळाली आहेत. या मतांच्या बळावर महापालिकेत मागील ३४ वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजप युतीला सत्तेपासून ‘वंचित’ करण्याची संधी आघाडीला चालून आली आहे. वर्षभरानंतर महापालिकेच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये यामुळे युतीच्या सत्तेला धोका निर्माण झाला आहे.
महापालिकेत शिवसेना-भाजप युतीला कधीच बहुमत मिळाले नाही. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकांमध्ये युतीने अपक्षांच्या मदतीनेसत्ता स्थापन केली. २०१५ मध्ये युतीचे ११३ पैकी फक्त ५१ उमेदवार निवडून आले. सातारा, देवळाईचा समावेश मनपात झाल्यानंतर भाजप, काँग्रेसला प्रत्येकी १ जागा मिळाली. युतीपाठोपाठ सर्वात मोठा पक्ष म्हणून महापालिकेत एमआयएमचा उदय झाला. पक्षाच्या चिन्हावर २४ नगरसेवक निवडून आले. नंतर काहींची हकालपट्टी पक्षातून करण्यात आली. बुढीलेन वॉर्डाच्या पोटनिवडणुकीत एमआयएमची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने हिसकावून घेतली. आजही एमआयएमचे संख्याबळ २३ आहे. महापालिकेत काँग्रेसचे ११ नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या ५ आहे. दोन्ही पक्षात सहा मुस्लिम नगरसेवकांचा समावेश आहे.
२२ दलित नगरसेवक
२०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, बीएसपी, रिपाइं डेमोक्रॅटिक, अपक्ष, अशा विविध पक्ष़ाच्या २२ दलित उमेदवारांनी विजय मिळविला. एमआयएमचे २३, काँग्रेस- राष्ट्रवादीमधील ६ मुस्लिम नगरसेवकांची बेरीज केल्यास २९ जण होतात. त्यात २२ दलित नगरसेवकांचा समावेश केला तर संख्या ५१ पर्यंत जाते. शिवसेना-भाजप युतीएवढीच ताकद दलित, मुस्लिम नगरसेवकांची आहे.
मिशन ७० ठेवणार
एमआयएम-बहुजन वंचित आघाडी आगामी मनपा निवडणुकीत युतीला सत्तेपासून रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे. कारण एमआयएमला मनपात घवघवीत यश मिळवून देणारे माजी जिल्हाध्यक्ष जावेद कुरैशी पुन्हा एकदा स्वगृही पोहोचले आहेत. शहरात ७० उमेदवार निवडून आणण्यासाठी जावेद कुरैशी व्यूहरचना आखणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. कारण मध्य विधानसभा मतदारसंघात जावेद कुरैशी ‘वंचित’चे संभाव्य उमेदवार राहण्याची शक्यता आहे. विधानसभेत यश मिळाल्यावर वंचित आघाडी मिशन मनपा राबविणार आहे.
युती विरोधात मतदारांमध्ये नाराजी
मनपात मागील ३४ वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. मागील साडेतीन दशकांमध्ये युतीने काय केले, असा प्रश्न नागरिक विचारत आहे. नऊ दिवसांनंतर पाणी, शहरात कचऱ्याचे डोंगर, जिकडे तिकडे खड्डे, मूलभूत सोयी- सुविधांची ओरड सुरू आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये युतीला पाणी, कचरा प्रश्नाचे बरेच चटके सहन करावे लागले.
पक्षीय बलाबल
शिवसेना - २८
भाजप - २३
एमआयएम - २३
काँग्रेस - १२
बीएसपी - ०५
राष्ट्रवादी काँग्रेस - ०५
रिपाइं(डेमोक्रॅटिक) - ०२
अपक्ष - १७
एकूण - ११५