औरंगाबाद : शहरातील सर्वच राजकीय पक्ष महापालिका निवडणुकीची ( Aurangabad Municipal Corporation Election) आतूरतेने वाट पाहत होते. अखेर या कुरुक्षेत्राचा रणसंग्राम सुरू होणार असल्याचे पत्र मंगळवारी सायंकाळी राज्य निवडणूक आयोगाने ( State Election Commission ) महापालिकेला दिले. शासनाने मंजूर केलेल्या नवीन नियमानुसार प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.
शहरातील ११५ वॉर्डांमध्ये एकूण ३८ प्रभाग असतील, यावर आयोगाने शिक्कामोर्तब केले. ३ वॉर्डांचे ३७, तर ४ वॉर्डांचा एक स्वतंत्र प्रभाग असणार आहे. २०११ मधील लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून नवीन प्रभाग रचना करावी, यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची एक समिती गठित करावी, असे प्रशासनाला सूचित केले आहे. आयोगाने उचललेल्या ठोस पावलामुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक एप्रिल-मे मध्ये होण्याची शक्यता आहे. महापालिकेची मुदत एप्रिल २०१९ मध्ये संपली. कोरोना संसर्ग, नवीन आरक्षण सोडतीचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्याने निवडणुकीला मुहूर्त लागत नव्हता. इकडे ११५ वॉर्डांतील इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेवक चातकाप्रमाणे आयोगाच्या आदेशाची वाट पाहात होते. आयोगाने राज्यातील २१ महापालिकांना प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले. यात औरंगाबादचाही समावेश आहे. महापालिकेने यापूर्वी तयार केलेली एक सदस्यीय वॉर्ड रचना रद्द करण्यात येत असल्याचे आयोगाने म्हटले असून, ५ ऑक्टोबरपासूनच कामाला सुरुवात करावी, असे निर्देश दिले आहेत.
‘लोकमत’चे वृत्त खरे ठरले‘लोकमत’ने २५ सप्टेंबर २०२१ रोजी शहरात एकूण ३८ प्रभाग होतील असे वृत्त प्रसिद्ध केले होते. ३ वॉर्डांचा एक याप्रमाणे शहरात ३७ प्रभाग नव्याने तयार होतील. सातारा-देवळाईतील ४ वॉर्डांचा एक प्रभाग असेल असेही वृत्तात म्हटले होते. आयोगाने काढलेल्या आदेशात यावर शिक्कामोर्तब झाले आहे.आयोगाने दिलेली लोकसंख्या-१२,२८,०३२अनुसूचित जाती लोकसंख्या- २,३८,१०५अनुसूचित जमाती - १६,३२०
आयोगाच्या मनपाला सूचना :
- २०११ च्या जनगणनेनुसार प्रगणक गटनिहाय अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीची लोकसंख्या, नकाशे उपलब्ध करून घ्यावेत.
- कच्चा आराखडा तयार करताना अनुभवी अधिकारी, नगर रचनाकार, संगणक तज्ज्ञ आवश्यकतेनुसार घ्यावेत.
- प्रभागाची लोकसंख्या दहा टक्के कमी किंवा दहा टक्के जास्त ठेवता येईल.
- प्रभागातील मोठे रस्ते, गल्ली, नद्या, नाले, डोंगर, उड्डाणपूल नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊनच हद्द निश्चित करावी.
- प्रभागातील वस्त्यांचे विभाजन हाेणार नाही, प्रगणक गट फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी.
- राजकीय दबावाला बळी पडून अनेकदा रचना केली जाते. त्यामुळे काटेकोरपणे काम करावे.