औरंगाबाद : महापालिकेतील उच्च पदांवर काम करणारे अधिकारी पुढील चार ते पाच महिन्यांमध्ये निवृत्त होत आहेत. पदोन्नतीने ही पदे भरण्यासाठी महापालिकेचे अधिकारी नाहीत. महापालिकेचे कामकाज चालविण्यासाठी भविष्यात अधिकारीच राहणार नाहीत. त्यामुळे शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी आणण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी सांगितले.
महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे पाच महिन्यांनंतर निवृत्त होत आहेत. त्यापूर्वी अनुभवी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे एक महिना अगोदर निवृत्त होत आहेत. महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. याशिवाय यांत्रिकी विभागातील बाबूराव घुले यांच्यासह वेगवेगळ्या विभागांतील अधिकारी निवृत्त होत आहेत. मागील चार ते पाच वर्षांपासून महापालिकेचे प्रभारी अधिकारी नेमण्यात येत आहेत. अनेक महत्त्वाच्या पदांवर कंत्राटी पद्धतीने कर्मचारी आणि कनिष्ठ अभियंते नेमण्यात आले आहेत. काही निवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पुढील चार ते पाच महिन्यांनंतर निवृत्तीचे प्रमाण वाढणार आहे. महापालिकेचे नियमित कामकाज सांभाळण्यासाठी अधिकारी राहणार नाहीत, अशी परिस्थिती आहे.
शहर अभियंतासारख्या उच्च पदावर अधिकारी नेमण्यासाठी महापालिकेकडे अधिकारी नाही. या पदावर नियुक्ती करण्यासाठी कार्यकारी अभियंता म्हणून किमान पाच वर्षांचा अनुभव हवा असतो. वेगवेगळ्या विभागांमध्ये पदोन्नती देऊन ही रिक्त पदे भरता येत नाहीत, अशी परिस्थिती आहे. ऐनवेळी प्रशासनाची कोंडी होऊ नये म्हणून आतापासूनच शासनाकडून वेगवेगळ्या पदांवर प्रतिनियुक्ती पद्धतीने अधिकारी आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. आतापासूनच प्रक्रिया सुरू केली तर पुढील चार ते पाच महिन्यांनंतर अधिकारी महापालिकेला मिळतील, अशी अपेक्षा पाण्डेय यांनी व्यक्त केली.