औरंगाबाद : गुंठेवारी भागातील मालमत्ताधारकांना पीआर कार्ड देण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाठपुरावा सुरू केला आहे. नगररचना विभागाने लॉकडाऊनपूर्वी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नगर भूमापन कार्यालयाला पत्र देऊन गुंठेवारीतील मिळकतधारकांना पीआर कार्ड देण्याची कार्यवाही करण्याची विनंती केली होती. मात्र, अद्यापही याबाबत संबंधित विभागांकडून कोणतीच कार्यवाही झाली नाही.
शहरात सुमारे १५० गुंठेवारी वसाहती आहेत. या वसाहतींमध्ये सुमारे १ लाखपेक्षा जास्त मालमत्ता आहेत. मात्र, बहुसंख्य मालमत्तांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार हे बॉण्ड पेपरवर झालेले आहेत. काही शेतमालक किंवा भूमाफियांनी एनए न करताच या भागात शेतजमिनींमध्ये २० बाय ३० चे प्लॉट पाडून विक्री केली आहे. त्यामुळे हे भूखंड अधिकृत नाहीत. याच कारणाने या भागातील मिळकतधारकांना पीआर कार्डची प्रतीक्षा आहे. महापालिकेतील राजकीय मंडळींनी यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावासुद्धा केला होता. अवर सचिवांनी २० फेब्रुवारी २०२० रोजी पालिकेला पत्र पाठवून याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर नगररचना कार्यालयाने मार्च महिन्यात कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागण्याच्या पार्श्वभूमीवरच जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नगर भूमापन कार्यालयाला शुक्रवारी पत्र पाठविले होते.
गुंठेवारीतील मिळकत धारकांना पीआर कार्ड देण्याबाबत आपल्या विभागाकडून संबंधितांना आदेशित करावे. तसेच पालिकेने गुंठेवारीअंतर्गत नियमाधिन केलेल्या भूखंड, मिळकत धारकांना गुंठेवारी नियमितीकरणाचा दाखला नकाशासह दिलेला आहे. त्यानुसार पीआर कार्ड कार्यवाही करावी, अशी विनंती या पत्रात करण्यात आली होती. मात्र, पालिकेच्या या विनंतीवर संबंधित विभागांनी अद्यापही कार्यवाही सुरू केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रशासक पीआर कार्डचा प्रश्न सोडवणारशहरातील गुंठेवारी पीआर कार्डचा प्रश्न सोडवला जाणार आहे. त्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. लवकरच हा प्रश्न निकाली निघेल.- आस्तिककुमार पांडेय, प्रशासक