औरंगाबाद : शहरातील विविध मालमत्तांकडे असणाऱ्या थकबाकीचा आकडा पाहून धक्काच बसेल, अशी स्थिती आहे. सुमारे ५१२ कोटींची ही थकबाकी असून ही रक्कम महापालिकेकडून वसूल होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मनपाकडून दरवर्षी मालमत्ता कराची शंभर टक्के वसुली होत नाही. अनेक मालमत्ताधारकांकडे थकबाकी राहते. त्यावर दंड, व्याज लावण्यात येत आहे. त्यामुळे थकबाकीचा आकडा आता चक्क ५१२ कोटींपर्यंत पोहोचला आहे. मालमत्ता करावरील ७५ टक्के व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सोमवारी पहिल्याच दिवशी शहरातील २१९ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला. नागरिकांना ९ लाख ५५ हजार रुपये सूट देऊन ३८ लाख ४४ रुपये वसूल करण्यात आले.
मनपाने चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी २०० कोटी रुपये मिळावेत, असे नियोजन केले आहे. प्रशासनाने थकबाकी आणि चालू वर्षाचा कर या दोन्हींच्या वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यात थकबाकीची जास्तीत जास्त रक्कम वसूल होण्याकरिता त्यावरील व्याज आणि दंडाच्या रकमेत ७५ टक्केसूट देण्याची सवलत १५ जानेवारीपर्यंत राहील. मनपाने आता बड्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. एक लाख रुपयापेक्षा अधिक मोठी रक्कम असलेल्या थकबाकीदारांना मनपाकडून वैयक्तिक पत्र पाठविण्यात येत आहे. मात्र ५१२ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीकडे आतापर्यंत महापालिका प्रशासन, पदाधिकारी आणि नगरसेवक गांभिर्याने पाहिलेले नाही.
कर वसुली शिबीर शहरातील नऊ झोनमध्ये कर वसुलीचे शिबीर लावण्यात येणार येत आहे. याशिवाय मालमत्ता कराची काही वादग्रस्त प्रकरणे आहेत. न्यायालयात ही प्रकरणे प्रलंबित आहेत. ती प्रकरणे निकाली निघावीत म्हणून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कर अदालत घेण्यात येणार आहे. मनपा मुख्यालयात कायमस्वरूपी शिबीर सुरू केले जाईल. त्यात नागरिकांना आपला थकीत कर भरता येईल, असे महापौर नंदकुमार घोडेले, कर निर्धारक व संकलक करणकुमार चव्हाण यांनी सांगितले.
मनपाच्या रेकॉर्डवरील मालमत्तामालमत्ता संख्या थकीत करनिवासी २,२५,७१४ ३०८ कोटीव्यावसायिक २३,४४७ १४५ कोटी औद्योगिक ७५३ ७ कोटी मिश्र ५,५१२ ३० कोटीशैक्षणिक ३३३ १७ कोटीशासकीय १२९ ५ कोटीएकूण २,५७,०३१ ५१२ कोटी