औरंगाबाद : महापालिकेच्या विद्युत विभागातील लाइनमनने महापालिकेचा पथदिवा चक्क आपल्या घराजवळ लावून घेतला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर घरातही याच पथदिव्यातून अनधिकृतपणे वीज घेतली. ही बाब उघड झाल्यानंतर प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी संबंधित लाइनमनला तडकाफडकी निलंबित केले.
प्रशासकांच्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. भीम आढे असे या लाइनमनचे नाव आहे. आढे हे सिडको एन-७ मध्ये राहतात. त्यांच्याकडे विद्युत विभागाच्या कामकाजाची जबाबदारी आहे. रस्त्यावर लावण्यात येणारा पथदिवा त्यांनी स्वत:च्या घराजवळ ऑडशेपच्या जागेत लावून घेतला. तसेच त्यातूनच स्वत:च्या घरातही वीज कनेक्शन घेतले. याबाबत काही जणांनी प्रशासक चौधरी यांच्याकडे तक्रार केली.
चौधरी यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थळ पाहणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. महापालिकेने शहरात सर्वत्र आधुनिक एलईडी दिवे लावण्याचे धोरण स्वीकारलेले आहे. परंतु जास्त प्रकाश पडावा यासाठी संबंधित लाइनमनने आपल्या घराजवळ बसविलेल्या पथदिव्यावर सोडियम दिवा लावला. एलईडीसाठी ३२ वॅट वीज लागते. तर सोडियम दिव्याचा वीज वापर हा २४० वॅट इतका असतो, असे विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अनेक दिवसांपासून घरातही मनपाच्याच विजेचा वापर सुरू होता.