औरंगाबाद : महापौर, उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सेना- भाजप युतीच्या उमेदवारांनी अर्ज भरले. यावेळी शिवसेनेतर्फे नंदकुमार घोडेले यांनी महापौर पदासाठी तर विजय औताडे यांनी उपमहापौर पदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते उपस्थित होते.
शिवसेनेतर्फे नंदकुमार घोडेले यांची महापौरपदाचा उमेदवार म्हणून आधीच निवड जाहीर झाली होती. परंतु; उपमहापौरपदासाठी भाजपच्या स्थानिक कोअर कमिटीमध्ये एकमत न झाल्याने उमेदवारी निश्चित करण्याचा चेंडू श्रेष्ठींकडे सोपविण्यात आला होता. अडीच वर्षांसाठी हे पद असल्याने अचानक इच्छुकांची संख्या पाचपेक्षा अधिक झाली होती. शेवटी आज सकाळी पक्ष श्रेष्टींनी विजय औताडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला.
रविवारी होणार मतदान महापौर, उपमहापौरपदासाठी रविवारी ( दि. २९ ) निवडणूक घेण्यात येणार आहे. युतीकडे पूर्णपणे बहुमत असल्याने निवडणूक अधिक सुकर होणार आहे.