औरंगाबाद : शहरातील ५२ रस्ते गुळगुळीत करण्यासाठी महापालिकेने काढलेल्या १५० कोटी रुपयांच्या मागविलेल्या निविदाप्रकरणी मनपाकडे प्राप्त सर्व निविदाधारक कंत्राटदारांना विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी लेखी खुलासा मागविण्यात आला आहे. २४ फेब्रुवारीपर्यंत आपले म्हणणे मांडावे, असेही कंत्राटदारांना कळविण्यात आले आहे.
रस्तेकामांची निविदा प्रक्रिया डिसेंबर महिन्यात राबविण्यात आली. कंत्राटदारांकडून प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा निविदा मागविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. दुसर्यांदा निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर २५ जानेवारीपर्यंत निविदा दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी निविदा उघडून छाननी प्रक्रिया सुरू झाली. यात २३ कंत्राटदारांनी निविदा भरल्याचे समोर आले.
निविदांच्या छाननीत काही कंत्राटदारांकडून प्राप्त निविदांच्या कागदपत्रांत त्रुटी आढळल्या. संबंधित कंत्राटदारांकडून सविस्तर खुलासा मागविल्यानंतरच निविदा अंतिम करण्याचा निर्णय घेण्यात आला. २४ फेब्रुवारीपर्यंत कंत्राटदारांकडून लेखी खुलासा मागविण्यात आला आहे. त्यानंतर निविदा अंतिम केली जाणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.