औरंगाबाद : मागील अनेक वर्षांपासून वाहतुकीसाठी अडथळा ठरणारा रेल्वेस्टेशनसमोरील पेट्रोल पंप महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने मंगळवारी सकाळी भुईसपाट केला. दोन दिवसांत या जागेवर डांबरीकरण करून वाहतुकीसाठी रोड खुला करण्यात येणार आहे.
महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी पेट्रोलपंप चालकाला बोलावून पेट्रोल पंप स्वत:हून काढून घेण्याची सूचना केली. मात्र, पहाटे ४ वाजता पेट्रोलचा टँकर आल्याने त्याने पेट्रोल उतरवून घेतले. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे व्यवसाय सुरू केला. प्रशासक पाण्डेय अतिक्रमण हटाव पथकासह सकाळी १० वाजता रेल्वेस्टेशनसमोर दाखल झाले. कोणाला काही न सांगताच कारवाईला सुरुवात केली. वक्फ बोर्डाचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी कारवाईला कडाडून विरोध दर्शविला. जागा वक्फ बोर्डाची असल्याचा दावा त्यांनी केला. महापालिकेने हा दावा फेटाळून कारवाई सुरूच ठेवली.
जेसीबीने पेट्रोल पंपाचे मशीन काढण्यात आले. जमिनीतील टँक तसाच ठेवला. पेट्रोलपंप चालकाने स्वत:हून टँक काढून घेतला तर चांगले; अन्यथा मनपा त्यावरच डांबरीकरण करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, कार्यकारी अभियंता फड, आर. एस. राचतवार, सय्यद जमशीद आदींनी दुपारपर्यंत कारवाई पूर्ण केली. पेट्रोल पंपामुळे होणारी वाहतूक कोंडी भविष्यात होणार नाही. दोन दिवसांनंतर या ठिकाणी डांबरी रस्ता तयार करण्यात येणार आहे. यापूर्वी अनेकदा महापालिकेने पेट्रोलपंप काढण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही.
भूसंपादनाचा मावेजा कोणाला द्यावामहापालिकेने काही वर्षांपूर्वी रेल्वेस्टेशन मशीद कमेटीला २० लाख रुपये भूसंपादनाचा मावेजा दिला होता. मागील वर्षी भूसंपादनापोटी दीड कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले. हा निधीही मनपा मशीद कमेटीलाच देणार आहे. पेट्रोल पंपाच्या जागेच्या पीआर कार्डवर मशीद कमेटीचे नाव आहे. त्यामुळे वक्फ बोर्डासोबत आम्ही पत्रव्यवहार, बोलणी अजिबात करणार नसल्याचे नगररचना विभागाचे सहसंचालक ए. बी. देशमुख यांनी सांगितले.