औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात महापालिकेने (Aurangabad Municipal Corporation ) ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित केलेली १० एकर जागा आता स्मार्ट सिटीला देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या शहर बस डेपोसाठी या जागेचा वापर केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महापालिकेतर्फे बाजार समिती परिसरात आरक्षण तर टाकण्यात आले. मात्र, मागील १५ वर्षांत ट्रक टर्मिनल उभारले नाही. महापालिकेतर्फे या जागेवर वाहतूकनगर विकसित केले जाणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. आता ही जागा स्मार्ट सिटीला देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत शहर बससेवा सुरू केली आहे. त्यासाठी शंभर बस खरेदी करण्यात आल्या आहेत. या बस सध्या एस. टी. महामंडळाच्या चिलकठाणा येथील कार्यशाळेत उभ्या केल्या जात आहेत. बस डेपोसाठी जागा मिळावी, यासाठी महापालिकेचा एस. टी. महामंडळाकडे पाठपुरावा सुरू होता. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या सूचनेनंतर शहर बस डेपोसाठी जागा देण्यास एस. टी. महामंडळाने सहमती दिली होती. असे असतानाच आता जाधववाडी भागातील ट्रक टर्मिनलची जागा स्मार्ट सिटीला देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती, महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी बैठक घेतली. त्यात प्राथमिक चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या जागेवरून महापालिका व बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद आहे. दहा एकर जागेसाठी पैसे भरल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे, मात्र केवळ सात एकर जागाच महापालिकेच्या ताब्यात असल्याचे सांगितले जात आहे. बाजार समितीने काही जागा पणन महासंघाला विक्री केली आहे. त्यांच्याकडून ही जागा महापालिकेने घ्यावी, असे बाजार समितीचे म्हणणे आहे.