औरंगाबाद : महापालिकेने मध्यवर्ती जकात नाक्याजवळ एक पेट्रोलपंप सुरू केला आहे. आता आणखी चार ठिकाणी पेट्रोलपंप सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी जागा आणि पेट्रोलियम कंपन्यादेखील ठरविण्यात आल्या असून, लवकरच पेट्रोलपंपांची उभारणी केली जाणार आहे.
शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले, पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर पंपांसाठी जागांची पाहणी केली. चिकलठाणा कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या शेजारी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा पंप असेल. हर्सुल-सावंगी येथील पालिकेच्या टोल नाक्याच्या जागेवर भारत पेट्रोलियमच्या सहकार्याने पंप सुरू करण्यात येणार आहे. गरवारे क्रीडा संकुलाच्या जवळ, कांचनवाडी भागात मनपा कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान परिसरात एचपीसीएलच्या मदतीने पेट्रोलपंप सुरू केला जाणार आहे.
पालिकेच्या जागेवर पेट्रोलियम कंपन्या पंप उभारतील. पंप मनपा चालविल. कंपनीकडून पालिकेला जागेचे भाडे मिळेल, शिवाय मनपाच्या वाहनांना कंपनीच्या दरात पेट्रोल आणि डिझेल मिळेल. सर्वसामान्य नागरिकांना व्यावसायिक दराने इंधनाची विक्री होईल. मिळणारा नफा मनपा खात्यावर जमा होईल, असा दावा करण्यात येत आहे.