औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेने १०० शहर बस खरेदी केल्या आहेत. त्यातील ८३ बसेस मनपाला प्राप्तही झाल्या आहेत. आणखी ५० इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचा दोन दिवसांपूर्वी एका आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आला. बस खरेदीसाठी महापालिका लवकरच राज्य शासनामार्फत केंद्राला प्रस्ताव पाठविणार आहे.
शहर बससेवेचा आढावा घेण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आपल्या दालनात एसटी महामंडळाचे प्रशांत भुसारी, सहायक आयुक्त सुरेश कवडे, मो. रा. थत्ते आणि इतर अधिकाऱ्यांची दोन दिवसांपूर्वी आढावा बैठक घेतली. मनपाकडे १०० पैकी ८३ बसेस आल्या आहेत. उर्वरित बसेस पंधरा दिवसांत प्राप्त होणार आहेत. शहरात स्मार्ट सिटी योजनेतील १०० बसेस चालतील. स्मार्ट सिटी प्रकल्पातून एकूण १५० बस घ्यायच्या आहेत. आतापर्यंत मनपाने ३६ कोटी रुपये खर्च करून १०० बसेस खरेदी केल्या आहेत. शहरातील प्रदूषण लक्षात घेऊन उर्वरित ५० बसेस या पुणे, मुंबईच्या धर्तीवर इलेक्ट्रिक असाव्यात, अशी चर्चा बैठकीत झाली. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही इलेक्ट्रिक बस खरेदीचा आग्रह धरला होता. स्मार्ट सिटी बोर्डाच्या बैठकीत ५० बस खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करून शासनाला पाठविण्याचे आदेश घोडेले यांनी दिले. स्मार्ट सिटीतून प्राप्त २८३ कोटींपैकी ३६ कोटींच्या बस खरेदी करण्यात आल्या आहेत.
एका बसची किंमत दोन कोटीडिझेलवर चालणाऱ्या बसेसपेक्षा इलेक्ट्रिक बस अत्यंत महाग आहेत. एका बसची किंमत २ कोटी रुपये आहे. बसच्या बॅटरीची किंमत ५० लाख रुपये असून, दर तीन ते पाच वर्षांनी बसेसचे काम करावे लागते. हा खर्च मनपाकडे नसल्याने शासनाने त्यांच्या स्तरावर बसेस खरेदी करून देण्याचाही प्रस्तावात समावेश असणार आहे.
मनपाला भेडसावतोय जागेचा प्रश्न शहरात मनपाकडे मोठी जागा नाही. सध्या शहर बस एस.टी. महामंडळाच्या डेपोत उभ्या कराव्या लागत आहेत. मनपाला स्वतंत्र डेपो तयार करावा लागणार आहे. महामंडळाकडे त्यासाठी रेल्वेस्टेशनसह इतर ठिकाणीही जागा उपलब्ध असल्याने ही जागा ६० वर्षे भाडेतत्त्वावर मनपाला मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करून महामंडळाला पाठविणार आहे.