औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी शहरात असलेल्या प्रत्येक बुथवर मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेकडे सोपविण्यात आली होती. ८९८ बुथवर विविध सोयी- सुविधा उपलब्ध केल्याची माहिती कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी यांनी दिली.अनेक ठिकाणी दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्पही तयार केले आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी शहरात ८९८ बुथ आहेत. या बुथवर सर्व सुविधा पुरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले होते. ९३ ठिकाणी दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था नसल्याचे पाहणीनंतर निदर्शनास आले होते. लाईट, पंखे, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा, अशा सुविधा महापालिकेला उपलब्ध करून द्याव्यात, असेही नमूद करण्यात आले होते. प्रत्येक बुथवर किमान १० ते १५ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे मनपातर्फे सांगण्यात आले होते.
मनपाला १ कोटी ३८ लाख रुपये किमान लागतील असे सांगण्यात आले होते. कंत्राटदारांनी कामे करण्यास नकार दिला होता. बिले लवकर देण्याचे आश्वासन देऊन सर्व मतदान केंद्रांची डागडुजी करून घेतली. सुरक्षेच्या दृष्टीने दरवाजे, कडी-कोंडा, शौचालय, वापरण्यासाठी पाणी आदी कामे केली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ठिकठिकाणी मंडप टाकण्यात येईल. पिण्याच्या पाण्यासाठी जार उपलब्ध करून देण्यात येईल. २३ एप्रिल रोजी मतदान करण्यासाठी सर्व बुथ सज्ज असल्याचेही सिद्दीकी यांनी नमूद केले.