- मुजीब देवणीकरऔरंगाबाद : महापालिकेतील शिक्षण विभागाने न झालेल्या सर्वसाधारण सभेचा उल्लेख करीत तब्बल दहा शिक्षकांच्या तासिका तत्त्वावर नेमणुका केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ९ फेब्रुवारी २०१९ रोजी कोणतीही सर्वसाधारण सभा झालीच नसल्याचे शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी मान्य केले. मात्र, विद्यार्थी हितासाठी शिक्षकांची नेमणूक केल्याचा दावा त्यांनी केला. विशेष बाब म्हणजे या नियमबाह्य शिक्षक नियुक्तीप्रकरणी प्रशासनाने साधी चौकशीचीही तसदी घेतली नाही. ( Illegal teachers appointed case in Aurangabad Municipality )
महापालिकेत शिक्षणाधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीवर शासनाकडून अधिकारी येतात. २०१७ ते २०२० पर्यंत शासनाकडून प्रतिनियुक्तीवर शिक्षणाधिकारी म्हणून श्रीकांत कुलकर्णी यांची नियुक्ती केली होती. त्यांच्या कार्यकाळातील हा नियुक्तीचा विषय असल्याचे विद्यमान प्रभारी शिक्षणाधिकारी थोरे यांनी सांगितले. तासिका तत्त्वावरील फाईलची तपासणी केली असता, ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे कोणतेही इतिवृत्त नाही. कारणापुरता उतारा नाही. तासिका तत्त्वावर शिक्षक नेमावेत असे महापौर, आयुक्त यांचे तोंडी आदेशही नाहीत. फाईलमध्ये फक्त ९ फेब्रुवारीच्या एकमेव सभेचा उल्लेख केला आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, या फाईलवर तत्कालीन उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या सह्या आहेत. कोणत्याही अधिकाऱ्याने सर्वसाधारण सभेचा ठराव कुठे आहे, अशी विचारणा शिक्षण विभागाला केलेली नाही. शिक्षण विभागावर विश्वास ठेवून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सह्या केल्या आहेत.आतापर्यंत शिक्षण विभागाने वेळोवेळी ५१ तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या नियुक्त्या केल्याचे शिक्षणाधिकारी थोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मनपाच्या आस्थापनेवर ४१२, तासिका तत्त्वावरील ५१ मिळून ४६३ शिक्षक सध्या कार्यरत आहेत. १३ हजार ५०० विद्यार्थी संख्या असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मला विद्यार्थीहित महत्त्वाचे वाटतेशिक्षण विभागाने न झालेल्या सभेचा वेळोवेळी उल्लेख करीत तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. विद्यार्थीहित डोळ्यासमोर ठेवून हे काम केले असेल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षक नेमले असावेत असे मला वाटते.- रामनाथ थोरे, प्रभारी शिक्षणाधिकारी, मनपा.