औरंगाबाद : सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, रस्त्यावर कचरा टाकू नये, पिण्याच्या पाण्याचा दुरुपयोग करणे, बंदी असलेल्या मांजाची, कॅरिबॅगची विक्री करणारे, रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी मनपाने माजी सैनिकांचे ‘नागरी मित्र’ नावाचे एक पथक स्थापन केले. मागील चार वर्षांत या पथकाने औरंगाबादकरांकडून सर्वाधिक ४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. त्यानंतरही शहराला शिस्त लागलेली नाही, हे विशेष.
स्वच्छ भारत अभियानात मागील काही वर्षांपासून मनपाकडून जोरदार प्रयत्न केले जातात, मात्र शहर ‘टॉप टेन’मध्ये येत नाही. स्वच्छतेत नागरिकांकडून अपेक्षित सहकार्य अजिबात मिळत नाही. त्याचप्रमाणे बंदी असलेल्या कॅरिबॅगचा वापर वाढल्याने नाल्यांमध्ये पाणी साचून राहत होते. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे प्रमाण वाढले होते. त्याचप्रमाणे कचरा कोंडीनंतर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांची संख्या वाढली.
युद्धपातळीवर माजी सैनिकांचे पथक स्थापन करून त्यांना दंडाचे अधिकार दिले. प्रारंभी रस्त्यावर कचरा टाकणारे, कचरा जाळणारे, रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून वाहतुकीस अडथळा करणारे, अशा व्यक्तींविरोधात ही मोहीम हाती घेण्यात आली होती. पुढे बंदी घातलेल्या कॅरिबॅगची विक्री करणारे आणि वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. कोरोना संसर्ग काळात मास्क घालण्याची सक्ती केली होती. या आदेशाचा भंग करत विनामास्क बाहेर पडणाऱ्यांना पकडून त्यांच्याकडूनही प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला. या सर्व कारवायांचा अहवाल घनकचरा विभागाच्या प्रमुखांकडून प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. नागरिक मित्र पथकाचे प्रमुख प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
महापालिकेच्या पथकाने केलेली कारवाई- बंदी असलेल्या कॅरिबॅगचा वापर करणारे : ८,३०५- थुंकणे, कचरा जाळणे : २०,३१६- बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणे : १,०१९- बायोमेडिकल वेस्ट : २८५- मांजा पतंग : ०५- क्लासेसचे पोस्टर : ११३- पाण्याची नासाडी : ६०८- विना मास्क : २८,४०८एकूण : ५९,०५९दंड वसूल : ३ कोटी ९९ लाख ३६ हजार ६०० रुपये