औरंगाबाद : शहरातील ५० हजार पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने तब्बल ९ कंत्राटदार नेमले आहेत. या कंत्राटदारांनी मनपाच्या अंदाजपत्रकीय दरापेक्षा २० ते २५ टक्के अधिक दराने निविदा भरल्या. आचारसंहितेत त्यांना वर्कआॅर्डरही देऊन टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीवर प्रशासन तब्बल ३ कोटी रुपयांची उधळपट्टी करणार आहे.
विद्युत विभागातर्फे सध्या करण्यात येणाऱ्या प्रत्येक कामाची सखोल चौकशी त्रयस्थ अधिकाऱ्यामार्फत केल्यास कोट्यवधी रुपयांचे घोटाळे समोर येतील. चांगले पथदिवे काढून नवीन बसविण्याचा उद्योग मागील काही दिवसांपासून सुरू केला आहे. आता पथदिवे दुरुस्तीच्या नावावर तब्बल ३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. काम न करता बिले उचलणाऱ्या नऊ जुन्या कंत्राटदारांची निवड प्रशासनाने केली आहे. सहा महिन्यांसाठी हे काम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बंद पथदिवे दुरुस्त करणे एवढेच काम कंत्राटदरांकडे राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात दिल्ली येथील कंपनी नवीन एलईडी पथदिवे बसवीत आहे. कंपनीने आतापर्यंत २५ हजार पथदिवे बसविले आहेत. उर्वरित तीन महिन्यांमध्ये १५ हजार दिवे कंपनी बसविणार आहे. कंपनी पुढील दहा वर्षे ४० हजार पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती स्वत: करणार आहे.
मागील तीन महिन्यांपासून शहरातील जुने आणि कंपनीने बसविलेले नवीन अशा सर्व पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती स्वत: कंपनीच करीत आहे. या देखभाल दुरुस्तीपोटी मनपा प्रशासनाने कंपनीला एक रुपयाही दिला नाही. कंपनीने तशी मागणीही केली नाही. ४० हजार पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती कंपनी मोफत करण्यास तयार असेल तर मनपा ९ कंत्राटदार नेमून तब्बल ३ कोटी रुपयांची उधळपट्टी कशासाठी करीत आहे...? मागील तीन महिन्यांत ८ हजार बंद असलेले पथदिवे कंपनीने सुरू केले.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नऊ झोनमध्ये नऊ कंत्राटदार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आचारसंहितेत त्यांना वर्कआॅर्डरही देऊन टाकली. आता त्यांच्याकडून विद्युत विभाग शपथपत्र घेणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
कोणते दिवे दुरुस्त करणार...?शहरातील ४० हजारांपैकी २५ हजार पथदिवे अगोदरच दिल्लीच्या खाजगी कंपनीकडे आहेत. उर्वरित १५ हजार पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नऊ कंत्राटदारांची गरज नाही. मनपाने या कंत्राटदारांना वर्कआॅर्डर दिली. कामही सुरू झाले तर ते नेमके कोणत्या पथदिव्यांची देखभाल करणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.