औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या बैठकांचे सत्र सुरूझाले आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपची बैठक मंगळवारी (दि.११) सायंकाळी विभागीय कार्यालयात पार पडली. हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्यांवर निवडणुकीला सामोरे जाण्यासह साम, दाम, दंड, भेदाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यास शहराध्यक्ष संजय केणेकर यांनीही दुजोरा दिला.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली आहे. या बैठकीत आगामी महापालिकेच्या निवडणुकीची रणनीती तयार करण्याविषयी चर्चा केली. त्याचवेळी भाजपनेही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. मंडळनिहाय बैठका घेतल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ८० पेक्षा अधिक जागांवर भाजपच्या चिन्हावर उमेदवार उभे करण्याविषयी चर्चा करण्यात आली.
याशिवाय इतर कोणत्या पक्षाशी युती होऊ शकते का? याचाही अंदाज घेण्यात आला. निवडणूक जाहीरनाम्यात कोणते मुद्दे असावेत, निवडणुकीचा प्रचार कोणत्या मुद्यांवर करावा, याविषयीही प्राथमिक चर्चा करण्यात आली आहे. हिंदुत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या शिवसेनेचा मुद्दा यावेळी भाजप अधिक प्रभावीपणे राबविणार असल्याचेही बैठकीत ठरविण्यात आले. त्याचबरोबर शहराच्या विकासाचा प्रश्नही मांडण्यात येणार आहे. निवडणूक लढताना साम, दाम, दंड, भेद या चतुसूत्रीचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी दिली. या बैठकीला मराठवाडा संघटक भाऊसाहेब देशमुख, प्रदेश सरचिटणीस डॉ. भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय औताडे आदींची उपस्थिती होती. औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे आणि माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांची अनुपस्थिती होती. या बाबत केणेकर यांना विचारले असता, ते दोघेही शिर्डीला दर्शनासाठी गेले असल्याचे सांगितले.