औरंगाबाद : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल २०२० मध्ये होणे संभाव्य आहे. त्या निवडणुका पहिल्यांदाच प्रभागनिहाय होणार असून, ११५ वॉर्डांसाठी २९ प्रभागांत सामाजिक आरक्षणासाठी बुधवारी १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. विद्यापीठातील नाट्यगृहात सोडत होणार आहे. या सोडतीबाबत राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी सायंकाळी पत्र दिल्याची माहिती उपायुक्त मंजूषा मुथा यांनी दिली.
मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रभाग रचनेच्या आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यानुसार अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, तसेच सर्वसाधारण महिलांसाठी व सर्वसाधारण खुला या प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित केले जाणार आहे. आरक्षणात कुणाची लॉटरी लागणार, कुणाची संधी हुकणार हे सोडतीअंती स्पष्ट होईल. सोडतीनंतर शुक्रवारी २० डिसेंबर रोजी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.
यावेळी महापालिकेची निवडणूक प्रभाग म्हणजे बहुसदस्यीय पद्धतीने पहिल्यांदाच होणार आहे. एकेक प्रभाग सुमारे ४० ते ४५ हजार लोकसंख्येचा असण्याची शक्यता आहे. एका प्रभागातून प्रत्येकी चार सदस्य निवडले जाणार आहेत. त्यासाठी प्रभाग रचनेचे काम दीड महिन्यापासून करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेच्या निवडणूक विभागाने नवीन प्रभाग रचनेचा आराखडा तयार करून तो जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सादर केला होता. विभागीय आयुक्तांनी तो आयोगाकडे सादर केला. ती प्रभाग रचना अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, त्याआधी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित केले जाणार आहे. त्यासाठी सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
२० डिसेंबरपासून सूचना, हरकती घेणार महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिल्यांदाच नवीन प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेची अधिसूचना शुक्रवारी, २० डिसेंबर रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध होईल. त्यानंतर रचनेबाबत कुणाला काही सूचना आणि हरकत करायची असेल, तर त्यांना करता येईल. ३० डिसेंबरपर्यंत सूचना आणि हरकती स्वीकारल्या जातील. शनिवार ४ जानेवारी २०२० रोजी प्राप्त सूचना आणि हरकतींचे विवरणपत्र निवडणूक आयोगास सादर केले जाणार आहे, असे महापालिका प्रशासनाकडून समजले आहे.
२०११ च्या लोकसंख्येवरच रचना २०११ च्या जनगणनेनुसार असलेली लोकसंख्या २०१५ साली झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत गृहीत धरण्यात आली होती. कारण २०११ ची लोकसंख्या गृहीत धरून २०१५ च्या निवडणुका झाल्या होत्या. २०१५ च्या निवडणुकीनुसार ११५ वॉर्ड झाले होते. ४ वॉर्डांचा एक प्रभाग असेल. एकूण २८ प्रभाग ४ वॉर्डांचे असतील, तर शेवटचा एक प्रभाग ३ वॉर्डांचा असेल. २०११ ची लोकसंख्या गृहीत धरूनच प्रभाग रचना करण्यात आली आहे. मे २०१९ मध्ये लोकसभा निवडणुका झाल्या, तसेच आॅक्टोबर २०१८ मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. तिन्ही मतदारसंघांत ९ लाख ७७ हजार ६७९ मतदार ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत आहेत. पूर्व आणि मध्य मतदारसंघ पूर्णत: मनपाच्या हद्दीचा आहे, तर पश्चिम मतदारसंघातील काही भाग वगळता मनपाची हद्द आहे.
रचनेसाठी ‘गुगल अर्थ’चा वापरनवीन प्रभाग तयार करताना ‘गुगल अर्थ’ची मदत घेतली. नाले, मोठे रस्ते, डोंगर-टेकड्या, संपणारी एखादी वसाहत याचा विचार करण्यात आला. चार वॉर्ड मिळून एक प्रभाग तयार करण्यात आलेला आहे. त्यात काही बदल करून आयोगाने रचनेस मंजुरी दिल्याची माहिती आहे.४प्रभाग रचना करताना गुगल अर्थचा वापर करणे, भौगोलिकदृष्ट्या सीमांची रचना योग्य आहे का नाही, हे तपासून अहवाल पुढे पाठविला, तसेच २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येचे ब्लॉक व्यवस्थित ठेवण्यात आलेत की नाही. हे विभागीय आयुक्तांनी तपासले.