औरंगाबाद : महापालिका निवडणुकीत वॉर्ड रचनेत प्रचंड घोळ केल्यानंतर निवडणूक विभागाकडून अद्यापही जादूचे प्रयोग सुरू आहेत. सोमवारी महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या वॉर्डनिहाय मतदार याद्यांमधील तब्बल १ लाखाहून अधिक मतदारांची नावेच गायब झाली आहेत. यामध्ये एकाच कुटुंबातील तीन विद्यमान नगरसेवकांचा समावेश आहे. बुधवारी महापालिकेकडे मतदार याद्यांमधील घोळ सुरू असल्याच्या तक्रारींचा पाऊस सुरू होता. विशेष बाब म्हणजे दोन दिवस उलटल्यानंतरही मनपाच्या वेबसाईटवर प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या नाहीत.
मनपाच्या निवडणूक विभागाला विधानसभेच्या मतदारयाद्यांची वॉर्डनिहाय विभागणी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. मनपा कर्मचाऱ्यांनी हे काम एवढ्या सुबकतेने केले की, एका वॉर्डातील मतदार दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या वॉर्डात टाकले आहेत. अनेक वॉर्डांतील हजारो नावे गायब आहेत. आसपासच्या कोणत्याच वॉर्डांमध्ये ही नावे सापडत नसल्याच्या तक्रारी विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी महापौर, निवडणूक विभागाकडे केल्या. वॉर्डांची लोकसंख्या आणि मतदारसंख्या यांचे समीकरण जुळत नसल्याचे चित्र आहे.
समर्थनगरातून दोन हजार मतदार गायबसमर्थनगर वॉर्डातील तब्बल दोन हजार मतदारांची नावे यादीत नसल्याचा आरोप माजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी केला आहे. २०१५ साली समर्थनगर वॉर्डात ८२५६ मतदार होते. मागील पाच वर्षांत काही नव मतदारांची भर पडलेली आहे. त्यामुळे ही संख्या मागीलवेळेपेक्षा किंचित वाढणे अपेक्षित होते. आता समर्थनगर वॉर्डाची मतदारसंख्या ६९९३ एवढीच आहे. वॉर्डातील दोन हजार नावे कुठे गेली असा सवाल राजूरकर यांनी केला आहे.
बायजीपुऱ्यातही घोळबायजीपुरा वॉर्डातील अडीच हजार नावे संजयनगर वॉर्डात टाकण्यात आली आहेत. कलीम कुरेशी यांनी त्याबाबत आक्षेप दाखल केला आहे. याच पद्धतीने भगतसिंगनगर वॉर्डातील अनेक नावे मयूर पार्क वॉर्डात टाकण्यात आल्याचा आक्षेप वैजयंता मिसाळ यांनी नोंदविला आहे.
प्रगणकांवर जबाबदारी झटकलीमहापौर नंदकुमार घोडेले यांनी मतदार याद्यांतील घोळांबाबत मनपा निवडणूक विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त सुमंत मोरे यांच्याकडे विचारणा केली. त्यावर मोरे यांनी नगर सचिव दिलीप सूर्यवंशी यांनी मतदार याद्यांचे काम केले, असे सांगत त्यांच्याकडे बोट दाखविले, तर सूर्यवंशी यांनी सर्व शिक्षक प्रगणक होते, त्यांनीच हे काम केले, असे म्हणत जबाबदारी झटकली. प्रारूप मतदारयादी नंतर दुरुस्त होईल, असेही त्यांनी नमूद केले.
कुरेशी कुटुंबियांनी दिला उपोषणाचा इशारानगरसेविका शबनम कलीम कुरेशी, नगरसेविका मलिका हबीब कुरेशी आणि नगरसेविका खतिजा कुरेशी या एकाच कुटुंबातील तिन्ही नगरसेविकांची नावे नवीन मतदार यादीतून गायब झाली आहेत. मतदार यादीत नावच नसेल, तर निवडणूक लढवायची कशी? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मात्र, तेथील ६२२ मतदारांचा एक भागच यादीतून गायब झालेला आहे. कलीम कुरेशी यांनी दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी महापौरांकडे केली आहे. तसेच मतदार यादीतील घोळ तात्काळ मिटला नाही, तर तिन्ही नगरसेविका, मी स्वत: आणि आमच्या भागातील नागरिक उपोषणाला बसतील, असे कलीम कुरेशी यांनी जाहीर केले.