औरंगाबाद : महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल महिन्यात होणे शक्य असून, त्या निवडणुकीत राज्य सरकारचा महाविकास आघाडीचा पॅटर्न राबविण्यात येण्याचे जवळपास निश्चित आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, अशी महाविकास आघाडी या निवडणुकीत होण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली असून, त्यांनी याबाबत होकार दिल्याची माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली.
शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन केल्यामुळे भाजपचा तीळपापड झाला आहे. भाजपने उपमहापौरपदाचा राजीनामा देत शिवसेनेशी येथील युती तोडली. सर्वसाधारण सभांमध्ये भाजपच आता प्रमुख विरोधी पक्ष झालेला आहे.शिवसेनेच्या महापौरांना कोंडीत पकडण्याची एकही संधी भाजप सध्या सोडत नाही. १,६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या स्थगितीचा मुद्दा पुढे करीत भाजपने शहरभर पत्रकबाजी, सोशल मीडियातून शिवसेनेला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना जरी ताकदीने उत्तर देत असली तरी मनपा निवडणुका समोर असल्यामुळे महाविकास आघाडी करणे आणि पाणीपुरवठा योजना मार्गी लागण्यासाठी जोर लावण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपप्रणीत असलेली प्रभाग रचना रद्द करून वॉर्डनिहाय निवडणुका घेण्याची मजल शिवसेनेने मारली.
पाणीपुरवठा योजना मार्गी लागावीपाणीपुरवठा योजना किती महत्त्वाची आहे, याबाबत शरद पवार यांना माहिती दिल्याचे खैरे यांनी सांगितले. भाजप या योजनेवरून राजकारण करीत आहे. त्यामुळे ही योजना तातडीने मार्गी लागण्यासाठी आपणही वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्याची विनंती खैरे यांनी पवार यांना केली.