औरंगाबाद : व्यासपीठाच्या मागे महापालिकेच्या आरोग्य केंद्रातील डिजिटल एक्स-रे मशीनच्या लोकार्पण सोहळ्याचा बॅनर; पण प्रत्यक्षात व्यासपीठावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांऐवजी नेत्यांचीच गर्दी जास्त होती. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची संख्या अधिक. सिल्कमिल काॅलनीतील मनपाच्या आरोग्य केंद्रातील यंत्राच्या लोकार्पण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसने ‘हायजॅक’ केल्याचे पहायला मिळाले.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्या सिल्कमिल काॅलनीतील आरोग्य केंद्रात सोमवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope) यांच्या हस्ते डिजिटल एक्स-रे मशीनचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आमदार अंबादास दानवे, महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, माजी महापौर नंदकुमार घोडेले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. नीता पाडळकर यांची उपस्थिती होती. आमदार दानवे यांच्या हस्ते नारळ फोडून आणि टोपे यांच्या हस्ते फीत कापून यंत्राचे लोकार्पण झाले.
लोकार्पणानंतर आरोग्य केंद्राच्या बाजूच्याच सभागृहात यंत्राच्या लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. येथे बॅनर महापालिकेचे लागले होते. मात्र, याठिकाणी फक्त राजकीय नेतेच हजर होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून राजेश टोपे यांच्यासह उपस्थित प्रत्येक पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सूत्रसंचालन करणाऱ्याकडून ‘शेर’ सादर करण्यात आला.
मनपा आयुक्त उंच आहेत, दुरूनही दिसतातलोकापर्णप्रसंगी फीत कापताना मनपा प्रशासक दिसत नाही, असे काहीजण म्हणाले. तेव्हा मनपा आयुक्त उंच आहेत, दुरूनही दिसतात, असे राजेश टोपे म्हणाले.
आस्तिककुमार पाण्डेय यांनी टाळले व्यासपीठयंत्राचे लोकार्पण झाल्यानंतर आस्तिकुमार पाण्डेय हे राजेश टोपे यांच्याशी संवाद साधून निघून गेले. पाण्डेय यांनी व्यासपीठावर जाण्याचे टाळले. त्यानंतर अन्य मनपा अधिकारी- कर्मचारीदेखील रवाना झाले.
सोशल डिस्टन्स पाळा, मास्क लावायंत्राच्या लोकार्पण सोहळ्यासाठी जमलेले अनेक कार्यकर्ते विनामास्क आणि गर्दी करून उभे होते. आस्तिकुमार पाण्डेय हे कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाले आणि लगेच त्यांनी सर्वांना सोशल डिस्टन्स पाळण्याची आणि मास्क लावण्याची सूचना केली.