औैरंगाबाद : शहरातील कचरा कन्नड तालुक्यात नेऊन प्रक्रिया करण्याचा प्रयोग राजकीय सूडबुद्धीने हाणून पाडण्यात आला. शहरातील कचराकोंडी फुटू नये असे वाटणाऱ्यांचे पितळही यानिमित्ताने उघडे पडले. शहरात २५ हजार मेट्रिक टन कचरा असून, महापालिका प्रशासनाने सोमवारी प्रत्येक निवडणूक वॉर्डासाठी १० कर्मचारी नियुक्त केले. तब्बल एक हजार कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे.
शहरात मागील पाच महिन्यांपासून कचराकोंडी सुरू आहे. १५१ दिवसांपासून शहरातील १५ लाख नागरिक कचऱ्याची दुर्गंधी, त्यातील अळ्या, माशांचा प्रादुर्भाव मुकाटपणे सहन करीत आहेत. महापालिका प्रशासन कचराकोंडी तूर्त कशी फुटेल, नागरिकांचे आरोग्य अबाधित कसे राहील यादृष्टीने कोणतेच प्रयत्न सुरू केलेले नाहीत. शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी पुढाकार घेतला. महापालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी, तहसीलदार यांची परवानगी मिळवून पिशोर येथील सहकारी साखर कारखान्याच्या पडीक जागेवर रविवारी २० ट्रक कचराही टाकला. प्रखर विरोध, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झालेला नव्हता. स्वत: आ. जाधव समोर उभे राहून मनपाचे ट्रक रिकामे करून घेत होते. अचानक महापालिकेने कचरा टाकण्याची मोहीम थांबविली. कोणाच्या आदेशावरून मोहिमेला पूर्णविराम देण्यात आला हे गुलदस्त्यात आहे.
शहरातील कचरा शहरातच साचून राहावा असे कोणाला वाटते, त्या राजकीय मंडळींवर आ. जाधव यांनी सडकून टीकाही केली. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे पितळ उघडे पडले. या डॅमेज कंट्रोलसाठी पदाधिकाऱ्यांनी वेगळी शक्कल लढविली. सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक शहरात दाखल होताच सकाळी ९ वाजता एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैैठकीत ११५ वॉर्डांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी महापालिकेचे वॉर्डनिहाय दहा कर्मचारी नियुक्त करावेत, असा आग्रह धरण्यात आला. आयुक्तांनीही क्षणार्धात होकार दर्शविला. दुपारी १ हजार कर्मचाऱ्यांच्या वॉर्डनिहाय नियुक्तीचे आदेशही काढण्यात आले. उद्यापासून हे कर्मचारी प्रत्येक वॉर्डात फिरून ओला व सुका कचरा वेगळा करण्यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
रोगराई पसरल्यास जबाबदार कोण?१६ फेबु्रवारीपासून शहरात कचराकोंडी सुरू आहे. मध्यवर्ती जकात नाका, हर्सूल, चिकलठाणा, पडेगाव, कांचनवाडी, औैरंगपुरा आदी अनेक भागांत कचऱ्याचे मोठमोठे डोंगर आहेत. या कचऱ्यावर प्रक्रिया करणे, शहराबाहेर नेऊन खतनिर्मिती करणे, यावर महापालिका प्रशासन अजिबात विचार करायला तयार नाही. कचराकोंडीमुळे शहरात रोगराई पसरल्यास त्याला जबाबादार कोण राहणार आहे.
कर्मचाऱ्यांना दंड लावणारशहरातील प्रत्येक वॉर्डात शंभर टक्के डोअर टू डोअर कलेक्शन झालेच पाहिजे. ओला व सुका कचरा वेगळा करायलाच हवा. रस्त्यावर कोणी कचरा टाकला तर संबधित सफाई कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, वॉर्ड अधिकारी यांना सामूहिकपणे दंड लावण्यात येणार असल्याची घोषणा महापौैर नंदकुमार घोडेले यांनी केली. यानंतरही कामात सुधारणा न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येईल. इंदौैर महापालिकेने एक हजार कर्मचारी निलंबित केले होते. त्याच धर्तीवर महापालिका व्यापक उपाययोजना करणार आहे.