औरंगाबाद : औषध फवारणी करत असताना अचानक फॉगिंग मशीनला अचानक आग लागल्याने मनपाच्या आरोग्य विभागातील एक कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.२३ ) सकाळी ८ वाजेच्या दरम्यान झाली. निवृत्ती वाघ असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव असून ते ३५ टक्के भाजले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी ८ वाजता महापालिकेच्या आरोग्य विभागातील मलेरिया कक्षात काम करणारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी निवृत्ती वाघ (52) नेहमीप्रमाणे सिडको एन 9 भागातील पवन नगर येथे औषध फवारणी करीत होते. फॉगिंग मशिनच्या सहाय्याने काम सुरू असताना वाघ यांच्या पाठीवरील मशीनने अचानक पेट घेतला. या घटनेत वाघ 35% जळाले आहेत. त्यांना त्वरित घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करत असताना नेमकी आग कशामुळे लागली याची चौकशी महापालिका प्रशासन करीत आहे.
शहरात मागील काही दिवसांपासून डेंग्यूच्या रुग्णात वाढ झाली आहे. यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध उपययोजना केल्या जात आहेत. साचलेले पाणी शोधून ते रिकामे करणे, मच्छरांसाठी औषध फवारणी करणे अशा उपयायोजना शहरात राबविण्यात येत आहेत. या दरम्यान झालेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.