औरंगाबाद : औरंगपुऱ्यात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला लागूनच सावित्रीबाई फुले यांचाही पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पुतळ्यांसाठी नियुक्त समितीने सावित्रीबाई फुले यांच्यासह शहागंज येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास मंजुरी दिली. महापालिकेतर्फे पुढील कारवाई लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.
दहा वर्षांपूर्वी महानगरपालिकेने शहागंजमधील चमनमध्ये सरदार वल्लभभाई पटेल आणि औरंगपुऱ्यात महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या बाजूलाच सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा ठराव घेतला होता. ठरावाच्या अनुषंगाने मनपाने या महापुरुषांचे पुतळे तयार करून घेतले; परंतु राज्य सरकारच्या गृह विभागाकडून पुतळे उभारण्यास परवानगी मिळत नसल्याने पुतळे उभारण्याचे काम रखडले होते. त्यानंतर राज्य सरकारने पुतळे उभारण्यासाठी परवानगी देण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार पुतळे उभारण्याची परवानगी जिल्हास्तरीय समितीकडून मिळणार असल्याने मनपाने जिल्हास्तरीय समितीकडे महापुरुषांचे पुतळे उभारण्याची परवानगी मागितली. जिल्हास्तरीय समितीची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या बैठकीस सदस्य सचिव निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, पोलीस उपायुक्त दीपाली घाडगे, मनपाचे कार्यकारी अभियंता सय्यद सिकंदर अली, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भगत यांची उपस्थिती होती. समितीने शहागंज चमन येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूणार्कृती पुतळा उभारणे आणि महात्मा फुले यांच्या बाजूलाच सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय झाला. लवकर पुतळे उभारण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल असे महापौरांनी सांगितले.