औरंगाबाद : शहरातील प्रमुख, अंतर्गत रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहनधारकांकडून लवकरच मनपा पार्किंग शुल्क वसूल करणार आहे. त्याचप्रमाणे पथविक्रेता धोरण ठरविण्यात आले असून, शहरातील टपऱ्या, हातगाडीचालकांना दररोज २० रुपये याप्रमाणे महिन्याला ६०० रुपये भाडे द्यावे लागणार आहे. या निर्णयाला नुकतीच सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.
केंद्र शासनाने पथविक्रेता धोरण जाहीर करण्यासाठी महापालिकेला २०१४ मध्ये आदेश दिले होते. हे धोरण ठरविण्यासाठी समिती नियुक्त करण्यासाठी महापालिकेला तब्बल चार वर्षे लागली. समिती स्थापन झाल्यानंतर शहरातील पथविक्रेत्यांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. त्यांची नोंदणी झाल्यानंतर प्रत्येकाला ओळखपत्र दिले जाणार आहे. दरम्यान पथविक्रेते, हातगाडीचालक, फिरत्या हातगाडीचालकांकडून महिन्याला पैसे वसूल करण्याचा प्रस्ताव मंगळवारी सर्वसाधारण सभेत प्रशासनातर्फे सादर करण्यात आला होता. महापालिकेने दर निश्चित केले असले तरी अंतिम निर्णय पथविक्रे ता समितीने घ्यावा, महापालिकेकडे पैसे वसूल करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नसल्याने यासाठी खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात यावी, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रस्ताव मंजूर केला. महापालिकेने वाहनांना पार्किंग शुल्क लावण्याचा निर्णय घेताच गुरुवारी व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने महापौरांची भेट घेऊन या निर्णयाला विरोध दर्शविला.
१२ हजार हातगाड्याशहरात तब्बल १० ते १२ हजार हातगाड्या असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. अधिकृत बाजारासोबतच विविध ठिकाणी फळभाजी विक्रेते, मटन, मासळी, दैनंदिन आवश्यक वस्तू विक्री करणारे, धार्मिक साहित्याची हातगाड्यांवरून विक्री केली जाते. त्यांच्याकडून दररोज २० रुपये भाडे घेण्यात येणार आहे.
असे राहतील दर - स्थिर टपऱ्या, स्थिर हातगाड्या दररोज २० रुपये - फिरत्या हातगाड्या दररोज १५ रुपये - डोक्यावर टोपली घेऊन फिरणारे व्यावसायिक दररोज १० रुपये.