औरंगाबाद : औषधांचा तुटवडा असलेल्या घाटी रुग्णालयाला महापालिकेकडून तब्बल दहा लाख रुपयांची औषधी देण्यात येणार आहे.
औरंगाबाद केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनकडे त्यासाठी विविध औषधींची मागणीही करण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. कचऱ्यामुळे शहरात विविध साथीचे आजार फैलावण्याची शक्यता आहे. ऐनवेळी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास मनपा आणि घाटी प्रशासनाची धावपळ होईल. १ हजार रुग्णांवर उपचार करता येऊ शकतील, अशी तयारीही घाटीने करून ठेवली आहे.
मागील आठवड्यात महापालिका आणि घाटी प्रशासनाची संयुक्त बैठक महापौरांनी घेतली होती. या बैठकीत घाटीच्या अधिकाऱ्यांनी औषधांचा बराच तुटवडा असून, महापालिकेने मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. महापौर घोडेले यांनी औषधांची यादी द्यावी, महापालिका ही औषधी खरेदी करून घाटीला देईल, असेही सांगण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच घाटी प्रशासनाने मनपाला विविध अत्यावश्यक औषधांची यादी देऊन मागणी केली आहे. औषधी प्राप्त होताच घाटी रुग्णालयाला देण्यात येणार असल्याचे महापौरांनी नमूद केले.