औरंगाबाद : आठ दिवसांपूर्वी क्रांतीचौक पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचे शर्ट पकडून शासकीय कामकाजात आडथळा निर्माण करण्याऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास तीन दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी सेवेतुन निलंबीत केले होते. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास त्याच पोलीस कर्मचाऱ्याने आकाशवाणी चौकात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यास मित्रांच्या मदतीने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.
निलंबित पोलीस कर्मचारी साहेबराव बाबुराव ईखारे (३२), पंकज पाटील आणि रवी चंद्रकांत जाधव (तिघे रा. कैलासनगर) असे आरोपींची नावे आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा विद्यार्थी मयुर सोळुंके हा भावासोबत २५ सप्टेंबरच्या मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास भुक लागल्यामुळे दुचाकीवर आकाशवाणी चौकातील एचडीएफसी बँकेच्या समोर आले. त्याठिकाणी काहीही सुरु नसल्यामुळे तेथून युटर्न घेऊन निघताना त्यांची दुचाकी तिघांनी आडवली. तुम्ही कुठे जात आहात असे विचारुन त्यांचे शर्ट पकडून मारहाण सुरु केली. दोघांना तोंडावर, नाकावर बेदम मारले. तेव्हा गस्तीवर असलेली पोलिसांची गाडी आली. तेव्हा पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांना नावे विचारल्यानंतर साहेबरावर ईखारे, पंकज पाटील आणि रवी जाधव असल्याचे सांगितले.
त्यावरुन विद्यार्थ्यांने दिलेल्या तक्रारीवरुन तिघांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वादग्रस्त पोलीस कर्मचारी साहेबराव ईखारे याने मोंढा नाका परिसरात क्रांतीचौक पोलीस वेळ संपल्यानंतर पानटपऱ्या बंद करीत होते. तेव्हा साध्या वेशात त्याठिकाणी ईखारे दोन मित्रांसोबत उभा होता. त्यास निघुन जाण्यास सांगितले असता त्याने पोलीस कर्मचारी सजनसिंग डोभाळ यांची कॉलर पकडली. तसेच त्यांना शिविगाळ करीत शर्ट फाडले. या प्रकरणात शासकीय कामकाजात अडथळ्याचा गुन्हा कर्मचाऱ्यावर नोंदविला. त्याचा अहवाल अधीक्षक कलवानिया यांना पाठविला. त्यावर कलवानिया यांनी २३ सप्टेंबर रोजी ईखारे यास सेवेतुन निलंबित केले होते.
शहरात पाच गुन्हे दाखल
निलंबित पोलीस कर्मचारी साहेबराव ईखारे याच्या विरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये बलात्कार, २०१९ व २०२२ मध्ये मारहाण, जवाहरनगरमध्ये २०१८ मध्ये मारहाण आणि क्रांतीचौक ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळ्याचा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. याशिवाय ईखारेच्या इतरही कारनाम्याची चर्चा पोलीस दलामध्ये करण्यात येते.