औरंगाबाद- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सुशोभिकरणासोबत उभारण्यात येणाऱ्या नव्या इन आउट गेट काम थांबवण्यात आले. ऐतिहासिक मुख्य प्रवेद्वाराला प्रतिगेट नको असे म्हणत आंबेडकरी चळवळीतून झालेल्या विरोधामुळे सुरक्षा केबिनसह इन आऊट गेटचे बांधकाम रविवारी पाडण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराला ऐतिहासिक संदर्भ आहेत. तसेच या प्रवेशद्वाराशी आंबेडकरी जनतेच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. या प्रवेशद्वाराचे संवर्धन आणि सुशोभिकरणाचे काम विद्यापीठाने हाती घेतले आहे. गेटच्या संवर्धन आणि सुशोभीकरणाच्या काम १४ जानेवारी पर्यंत पुर्ण करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाला गती देण्यात आली होती. सुरक्षा भिंती, बाजूच्या दोन्ही रस्त्यांची कामे पूर्ण झाले. सुरक्षा रक्षकांसाठी कॅबन व इनआऊट गेटचे आरसीसी व विटकाम पुर्णत्वास येत होते. विद्यापीठात येणाऱ्या-जाणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी इन-आउट गेटची उभारणी करण्यात येणार होती. त्या गेटच्या दोन्ही बाजून पाण्याचे कारंजे प्रस्तावित आहे.
कुलगुरूंच्या आदेशानुसार कुलसचिव डाॅ. भगवान साखळे यांनी जागतिक बँक प्रकल्प कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहून इन आउट गेट चे बांधकाम तातडी थांबवा. तसेच सुरक्षा रक्षक कॅबिनसह इन आऊट गेटचे बांधकाम २ दिवसांत काढून घ्या असे पत्र दिले होते. त्यानुसार रविवारी सकाळपासून इन आऊट गेटच्या ३ टाॅवरची उभारणी पुर्ण होत आलेली असतांना हे बांधकाम जेसीबीच्या साह्याने पाडण्याला सुरूवात झाली. आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थी नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी हा आंबेडकर चळवळीचा विजय असल्याच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर नोंदवल्या.
शिष्टमंडळांना दिले होते आश्वासन
हे प्रतिगेट नको, अशी भूमिका आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी मांडली. ज्येष्ठ नेते दिनकर ओंकार, सुर्यकांता गाडे, विजय वाहूळ, श्रावण गायकवाड, सचिन निकम, दीपक निकाळजे, राहुल वडमारे, डॉ.संदिप जाधव, गुणरत्न सोनवणे, कपिल बनकर, सोनू नरवडे आदींनी कुलगुरूंची भेट घेवून भूमिका स्पष्ठ केली होती. दिल्ली येथील इंडिया गेटच्या धर्तीवर सुशोभिकरणाच्या या प्रकल्पासाठी सुमारे २ कोटींचा खर्च केला जात आहे. विरोध असेल तर हे काम थांबवून ते काढून घेवू असे आश्वासन कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी शिष्टमंडळाला दिले होते.