औरंगाबाद:मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी 'लोक मला फुकट घालवत आहेत', अशी खंत व्यक्त केली. मूळ प्रश्नाकडे कुणाला वळायचेच नाही, निवडणुकीवेळी सर्व प्रश्नांचा विसर पडतो. जनताही मतपेटीतून राग व्यक्त करत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
मला फुकट घालवत आहेतयावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, नाशिकमध्ये मनसेने चांगले काम केले. मनसेने अनेक वर्षे टिकेल असा विकास केला. इतर ठिकाणीही रस्त्यापासून ते पाण्यापर्यंतचे प्रश्न आहेत. मात्र, निवडणुकीच्यावेळी मुख्य मुद्दे बाजूलाच राहतात. राजकारणी समाजाला बिघडवतो की, समाज राजकारण्यांना बिघडवतो. जोपर्यंत मतपेटीतून राग व्यक्त होणार नाही, तोपर्यंत कशाचाही अर्थ राहणार नाही. सध्या तरी मला लोक फुकट घालवत आहेत, असं ते म्हणाले.
निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच ओबीसी आरक्षणाचा गोंधळ राज्यभरातील महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच ओबीसी आरक्षणाचा गोंधळ सुरु आहे, असा थेट आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी केला. मी निवडणुकीसाठी बाहेर पडलो असे म्हणता येणार नाही. निवडणुका येतच राहतात, संभाजीनगरची निवडणूक आणखी वर्षभर पुढे आहे. निदान सहा आठ महिने तरी इथली निवडणूक होणार नाही, त्यासाठीच तर ओबीसीचे प्रकरण सुरू आहे. केंद्राने मोजायचे की राज्याचे मोजायचे, यावरून मोजामोजी सुरू झाली आहे. मूळ मुद्द्याला कुणीही सामोरे जायला तयार नाही. त्यांची हिंमतच नाही सामोरे जाण्याची. म्हणून निवडणूका पुढे ढकलण्याची शक्यता आहे, असं ते म्हणाले.
रणनिती सांगण्यास स्पष्ट नकारयावेळी पत्रकारांनी राज ठाकरेंना आगामी निवडणुकीसाठी तुमची स्ट्रॅटेजी काय, असा प्रश्न विचारला. त्यावर राज म्हणाले, स्ट्रॅटेजी ही हिडनच असते, उघड केली जात नाही. तुमच्याशी बोलण्याइतपत आमचे काम झालेले नाही, असं ते म्हणाले. याशिवाय, आज जिल्हाध्यक्ष, शहर संघटक, शहर अध्यक्ष यासह विविध नियुक्त्या केल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.