औरंगाबाद : ‘आई ही आई असते’ मग ती माणसाची असो अथवा पशू-पक्ष्यांची. शुक्रवारी(दि.3) दुपारी लेबर कॉलनीतील फ्रेंड गॅलरीसमोर एका भटक्या श्वान मातेचा अपघाती मृत्यू झाला. ती निपचित पडलेली. परंतु, तिच्या पिल्लांना काय ठाऊक की आपली आई आता या जगात नाही. नेहमीप्रमाणे तिची चार पिले कुशीत शिरून दूध पिण्यासाठी तुटून पडलेली, हे दृश्य पाहून येणाऱ्या-जाणाऱ्यांची मने हेलावून गेली.
हा प्रसंग लाईफ केअर ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन संस्थेचे सदस्य खान अकमल, खान नसीर, डॉ. उबेद कास्मी यांनी पाहिला. त्यांनी लगेच संस्थेचे सचिव जयेश शिंदे यांना माहिती दिली. तेही तत्काळ घटनास्थळी आले. भुकेजलेली पिले मृत श्वान मातेचे दूध पित असलेले दृश्य त्यांनीही पाहिले. त्यामुळे पिलांची भूक भागेपर्यंत त्यांना हटविणेही शक्य नव्हते म्हणून ते थांबले.
संस्थेच्या सचिवाने महानगरपालिकाचे शेख शाहिद यांना संपर्क करून ‘डॉग व्हॅन’ बोलली व मेलेल्या त्या श्वान मातेला नेण्यात आले. मृत श्वानाला उचलताना पिलांनी भुकंत कांगावा सुरू केला. अखेर पिलासह त्या मयत श्वानाला व्हॅनमध्ये टाकून नेण्यात आले. मध्यवर्ती जकात नाका येथील पशुचिकित्सालय येथे आता त्यांना ठेवण्यात आलेले आहे. त्या अनाथ पिलांना दत्तक योजनेअंतर्गत सांभाळ करणाऱ्या नागरिकाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
त्या पिलाच्या श्वान मातेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास करणेही गरजेचे आहे. काही परिसरामध्ये कुत्रे फिरू नये, असे अनेक नागरिक आहेत. कायद्यानुसार श्वानाला संरक्षण दिले पाहिजे. अनेक नागरिक देशी कुत्रे रस्त्यावर सोडून देतात, तर महागडे कुत्रे घरात पाळतात. देशी कुत्र्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे. - जयेश शिंदे, सचिव -लाईफ केअर ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन संस्था.