औरंगाबाद : वाळूज भागातील एका कंपनीत औषधी सिरप बनविण्यासाठी आणलेला डायझेपाम (सायकोट्राफिक नार्कोटीक ड्रग्ज) हा द्रव्य चोरून बाहेर आणत ब्लॅकमध्ये लाखो रुपयात विकणाऱ्या फार्मसिस्टला डमी ग्राहक बनून 'एनडीपीएस' पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. पकडलेल्या ५५५ ग्रॅम ड्रग्जची ब्लॅक मार्केटमध्ये तब्बल दहा लाख रुपये एवढी किंमत आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा नोंदविल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
गणेश दगडु लाळगे (३६, रा. रांजणगाव शेणपुंजी, ता. गंगापुर) असे फार्मासिस्ट आरोपीचे नाव आहे. 'एनडीपीएस' पथकाचे सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे यांच्या पथकास गणेश लाळगे हा वाळूज भागातील एनआरपी चौकात डायझेपाम हा गुंगीसाठी वापरला जाणारा पदार्थ विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती मिळाली. त्यासाठी 'एनडीपीएस' पथकातील अंमलदार विशाल सोनवणे हेच डमी ग्राहक बनले. त्यानुसार सपोनि. घुगे यांच्यासह उपनिरीक्षक नसीम खान, अंमलदार महेश उगले, धर्मराज गायकवाड, नितीन देशमुख, सुरेश भिसे, प्राजक्ता वाघमारे आणि दत्ता दुभळकर यांच्या पथकाने सापळा रचला. आरोपी लाळगे हा चौकात येताच त्यास ताब्यात घेतले. त्याची शासकीय पंचाच्या उपस्थितीत अंगझडती घेतल्यानंतर एका बॅगमध्ये ५५५ ग्रॅम डायझेपाम हे गुंगीकारण औषधी द्रव्य आढळून आले. त्याची शासकीय किंमती ५ लाख ५५ हजार एवढी असून, ब्लॅक मार्केटमध्ये तब्बल १० लाख रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही कारवाई सहायक आयुक्त विशाल ढुमे, निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनात केली.
कंपनीतुन आणले ड्रग्जआरोपी गणेश लाळगे हा रेड क्रॉस मेडिसिन कंपनीत फार्मासिस्ट म्हणून नोकरीला होता. त्याठिकाणी काम करीत असतानाच त्याने थोडे थोडे करून हे ड्रग्ज बाहेर आणल्याची कबुली पोलिसांच्या चौकशीत दिली आहे. लाळगे याने काही दिवसापूर्वीच कंपनीतील नोकरी सोडून दिल्याचेही सांगितले.