औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेत पर्यटनाच्या बाबतीत आगामी वर्षभरात नक्की परिवर्तन दिसेल, असे पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले. औरंगाबादेत दाखल झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले, वेरुळ मार्गावर देवगिरी किल्ला आहे, परंतु येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी आहे. अजिंठा-वेरुळ येथे जाणारे पर्यटक देवगिरी किल्ला पाहण्यासाठी येतील, यासाठी सर्किट तयार करण्यात येत आहे. यात इतर स्थळांचाही समावेश करण्यासंदर्भात चर्चा केली जाईल, असे लोढा यांनी सांगितले. पहिल्यांदा मंत्री झालो आहे. पर्यटन वाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल, असेही ते म्हणाले.
यावेळी शहरात १७ व १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महारोजगार मेळाव्याविषयी माहिती देण्यात आली.याप्रसंगी यावेळी एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, कौशल्य विकास आयुक्त दिपेंद्र सिंह कुशवाह, औरंगाबाद प्रादेशिक पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक श्रीमंत हारकर, भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, प्रवीण घुगे, विजय औताडे आदी उपस्थित होते.