औरंगाबाद : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैधपणे हॉटलेवर दारु पिण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणाऱ्या हॉटेलचालकासह दारु पिणाऱ्या ११ जणांना छापा मारुन पकडले. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवत जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयाने १२ आरोपींना एकुण ३० हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. ही संपूर्ण कारवाई २४ तासांच्या आत झाल्याची माहिती दुय्यम निरीक्षक जी.बी. इंगळे यांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे, दुय्यम निरीक्षक इंगळे यांच्यासह पथकाने मंगळवारी रात्री वडगाव कोल्हाटी परिसरातील हॉटेल माऊली याठिकाणी छापा मारला. या छाप्यात हॉटेल मालक ज्ञानोबा सुखदेव जानकर (रा.एकदरा, ता. माजलगाव, जि.बीड) यांच्यासह अवैधरित्या दारु पिण्यासाठी बसलेले योगेश मनोहर काळे, गोविंद माधवराव पाटील (दोघे रा. एन ६, सिडको), गौरव हिरामण बोंडे (रा. सारा सार्थक सोसायटी, वडगाव कोल्हाटी), पार्थ जितेंद्र गांधी (रा.सारागंगा, सिडको महानगर १), संतोष श्रीरंग तुपे (रा. गल्ली नं.१९८, कामगार चौक), निखिल ज्ञानदेव पाचपांडे ( रा. महावीरनगर, सिडको महानगर १), राजेंद्र बाबासाहेब जाधव (रा.गणेशवाडी), अनिल नामदेव पोपळघट (रा. श्रीरामनगर, रांजणगाव), संतोष धुमा राठोड (रा. शिवाजीनगर, रेणुकानगर), आशिष नारायण वाळके (रा. बजाजनगर, वडगाव कोल्हाटी), हरिदास रामदास नरवडे (रा.बालाजीनगर, एमआयडीसी वाळूज) यांना पकडले होते.
या आरोपींच्या विरोधात दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच त्यांच्या विरोधात बुधवारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करीत आरोपींना हजर केले. सुनावणीत न्यायाधिशांनी हॉटेल मालक जानकर यांना २५ हजार रुपये आणि दारु पिणाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती निरीक्षक इंगळे यांनी दिली. या गुन्ह्याच्या तपासात निरीक्षक आर.के. गुरव, दुय्यम निरीक्षक बी.आर.वाघमोडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक ए.जी.शेंदरकर, गणेश नागवे, जवान ठाणसिंग जारवाल, योगेश कल्याणकर, गणपत शिंदे आणि किशोर सुदंर्डे यांनी मदत केली.